cm देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी जोरदार राजकीय नेत्यांनी देखील तयारी सुरु केली आहे. निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप, शिवसेनेसह कॉंग्रेस आणि मनसे पक्ष देखील तयारी करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक इच्छा पूर्ण केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार एकनाथ शिंदे देखील इच्छूक असताना उद्धव ठाकरे यांना प्राधान्य देण्यात आले. राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टची पुनर्रचना करण्यात आली आहे, आणि या स्ट्रस्टवर उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारलं जात आहे, या पार्श्वभूमीवर आता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या ट्रस्टची पुनर्रचना करून उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काल (दि.15) राज्य सरकारकडून याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे, त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यासह आणखी चार जणांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे. या ट्रस्टकडून स्मारकाच्या कामावर लक्ष ठेवलं जाणार आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री सुभाष देसाई यांना या ट्रस्टच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पराग अलवानी आणि शिशिर शिंदे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना देखील या ट्रस्टमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती, कारण सध्या मुळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्याऐवजी या ट्रस्टवर आता उद्धव ठाकरे यांची वर्णी लागली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांनी बिहारच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवडणुकीत तेजस्वीच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होती. ती खरी होती की दिसायची होती हे कळायला मार्ग नाही. ज्याच्या सभेला अलोट गर्दी असते त्याचं सरकार येत नाही. पण ज्यांच्या सभेत खुर्च्या खाली होत्या त्यांचं सरकार येतं, हे कळण्याच्या पलिकडचे आहे. 10 हजार दिले हा एक फॅक्टर आहे. त्याने काही फरक पडला आहे. पण रोज लोक जे भोगत आहेत. त्यांच्या मनातून अजून जात नाही. हरकत नाही जो जिता वही सिकंदर आहे. बहूमत आल्यावरही त्यांना नेता निवडता येत नाही. महाराष्ट्रातही पाशवी मतदानानंतर नेता निवडायला त्यांनी काही वेळ घेतला,” असे टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी डागले.






