
Rohini Khadse on Bihar jamui Viral Video
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे जमुईतील व्हिडिओवर संताप व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ मन हेलावून टाकणारा असून त्याचवेळी चीड आणणारा आहे. अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या कथित गैरवर्तनाचा त्यांनी निषेध केला.यावेळी रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्रातील एका घटनेचाही संदर्भ दिला. त्यांच्या पोस्टनुसार, सिंहगडावर पर्यटनासाठी आलेल्या आठ वर्षांच्या मुलीने बरमूडा परिधान केल्याच्या कारणावरून काही जणांनी तिच्या वडिलांसोबत वाद घालत मारहाण केली होती. या दोन्ही घटनांचा संदर्भ देत त्यांनी तथाकथित ‘संस्कृती रक्षकां’वर प्रश्न उपस्थित केले.
“ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे, यांना कोण प्रोत्साहन देत आहे? यांना कायद्याची भीती राहिली नाही का?” असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
बिहारमधील हा व्हिडिओ प्रचंड मन हेलवून टाकणारा आणि त्यासोबतच चीड आणणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीचा या तथाकथित ‘संस्कृती रक्षकांनी’ अक्षरशः विनयभंगे केला आहे. असाच एक प्रकार महाराष्ट्रातही मागे घडला होता. ८ वर्षांची चिमूरडी सिंहगडावर बरमूडा घालून पर्यटनासाठी आली होती म्हणून… pic.twitter.com/KjlSBXAYVL — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) September 21, 2026
जमुईतील घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानेही स्वतःहून दखल घेतली आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढणे, तिला चुकीच्या पद्धतीने अडवणे, मारहाण आणि विनयभंगाच्या आरोपांबाबत आयोगाने बिहारच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल्याची माहिती आहे.व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि निश्चित कालमर्यादेत निष्पक्ष चौकशी करावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
जमुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल यांनी या घटनेला दुजोरा दिल्याची माहिती आहे. पीडित मुलीच्या जबाबानुसार, 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये सहा ते सात जण दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पोलिसांनी काही संशयितांची ओळख पटवली असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.