'...हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील 'नॉर्वेकर'; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सभागृहात दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचा मराठी मजकूर वाचला गेला. हा प्रस्ताव वाचताना झालेल्या सलग उच्चार चुकांमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. ‘महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठी लिहिता येत नाही आणि मराठीत विचार करता येत नाही. हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’ आहेत, याचा शोध घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘हा महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर विषय आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठी लिहिता येत नाही आणि मराठीत विचार करता येत नाही. हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’ आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. या महाराष्ट्रात मराठी अनिवार्य आहे. रिक्षाचालकालाही मराठी आली पाहिजे, असा आपण कायदा करतो. मुख्यमंत्री महाराष्ट्रात मराठीची सक्ती असल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी नियुक्त केलेल्या विधानसभा अध्यक्षांना मराठी येत नाही. ते मराठी भाषेचे दिंडवडे काढत आहेत.
आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचे वाचन त्यांना मराठीत करता आले नाही. राज ठाकरे यांनी विचारलेला प्रश्न योग्य आहे की ते भेळेचा कागद वाचत होते का? ज्या व्यक्तीला मराठी बोलता, वाचता किंवा लिहिता येत नाही, अशा व्यक्तीला त्या पदावरून तातडीने दूर केले पाहिजे. मला वाटते, त्यांना मराठी वाचता येत नसल्यामुळेच त्यांनी भाषणाची लिपी इंग्रजीत लिहून आणली होती. मुख्यमंत्री छातीठोकपणे सांगतात की, महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती आहे. मराठी तरुणांना नोकऱ्या द्या, अशी आमची मागणी असते. मग मराठीचे ज्ञान नसताना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना कोणी दिली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठी भाषेचा अपमान म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान
मराठी भाषेचा अपमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मात्र, त्याचा प्रत्यक्ष परिणाम कुठेच दिसत नाही. मंगलप्रभात लोढा यांना विधानसभा अध्यक्ष करा. मी जर तिथे उपस्थित असतो, तर जामनराव धोटे यांची आठवण झाली असती. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात मी तिथेच तीव्र निषेध नोंदवला असता. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने माफी मागितली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.






