
Sanjay Raut slams Mahayuti Government, Vidhan Parishad Electio, Mahayuti, MVA Candidates withdrawing nomination,
राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आता मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून आज (गुरुवार, ४ जून) विधान परिषद निवडणुकीतुन अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अश्यातच आता राज्यातील विविध विधानपरिषद मतदारसंघातून मोठ्या बातम्या येत असून विधान परिषद निवडणुकांआधीच महायुतीने जोरदार आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणुकीत अर्ज माघारी घेतल्याने १७ पैकी ५ जागा महायुतीने बिनविरोध मिळवल्याचे दिसत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून निवडणुका बिनविरोध करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये आज खर्च करण्यात आल्याचे खळबळजनक आरोप त्यांनी केले आहेत.
महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांसमोर आव्हान उभे केले होते. मात्र काही उमेदवारांनी कारणे देऊन निवडणुकीतून माघार घेतली यामुळे निवडणुकीआधीच महाविकास आघाडीचा किल्ला ढासळत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी संख्याबळाचं कारण देत तसेच मित्रपक्ष सहकार्य करत नसल्याचा आरोप करत माघार घेतली आहे. महायुतीच्या नेत्यांनी देखील बंडखोरांना शांत करण्यात यश मिळवले आहे. कोकण विधान परिषद मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला. तर नाशिकमध्ये गणेश गीते अर्ज माघार घेणार आहेत परंतु गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या असून शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि एका जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे. यावरूनच आता संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत खळबळजनक आरोप केले आहेत.
संजय राऊत म्हणाले, “मी आधीपासूनच सांगत होतो कि आपल्याकडे संख्याबळ नाही. तरीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाने निवडणुका बिनविरोध होऊ नयेत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज शेवटपर्यंत टिकायला हवे होते. पण, निवडणुका बिनविरोधच करायच्या या सरकारच्या अट्टाहासापायी अनेक मार्गांचा अवलंब झाला. त्यात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांच्या उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न काही ठिकाणी यशस्वी झाला. आज दिवसभरात निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले,” असे ते म्हणाले.
मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीआधीच मविआला धक्का, १७ पैकी ५ जागांवर महायुती बिनविरोध
ते पुढे म्हणाले, “प्रमुख उमेदवारांना किमान २५ कोटी रुपये दिले आहेत. मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये हा व्यवहार झाला. त्यानंतर कोकणातील रायगडमध्ये माघार घेण्यात आली. संभाजीनगरमध्ये सुद्धा आमच्या एका उमेदवाराने माघार घेतली. तिथेही साधारणपणे त्याच पद्धतीचे व्यवहार झाले. या प्रकारानंतर, शिवसेनेने बाळा माने यांची हकालपट्टी केली. संभाजीनगरात देवयानी डोणगावकर, कृष्णा डोणगावकर यांची हकालपट्टी केली आहे. हे आमच्याकडे चालणार नाही. पक्षप्रमुखांची परवानगी न घेता, पक्षाची परवानगी न घेता कोणी माघार कसे घेऊ शकतात. ज्यांनी व्यवहार केले त्यांनीच आम्हाला या व्यवहारांबाबत सांगितले. राज्य आणि देश नासवण्याचा हा प्रकार खूप घातक आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.