विधानपरिषद निवडणुकीआधीच मविआला धक्का, १७ पैकी ५ जागांवर महायुती बिनविरोध
राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आता मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून आज (गुरुवार, ४ जून) विधान परिषद निवडणुकीतुन अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अश्यातच आता राज्यातील विविध विधानपरिषद मतदारसंघातून मोठ्या बातम्या येत असून विधान परिषद निवडणुकांआधीच महायुतीने जोरदार आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने तसेच उमेदवारांनी निवडणुकीत अर्ज माघारी घेतल्याने १७ पैकी ५ जागा महायुतीने बिनविरोध मिळवल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीला मात्र यातून मोठा धक्का बसला असून आता अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांसमोर आव्हान उभे केले होते. मात्र काही उमेदवारांनी करणे देऊन निवडणुकीतून माघार घेतली यामुळे निवडणुकीआधीच महाविकास आघाडीचा किल्ला ढासळत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी संख्याबळाचं कारण देत तसेच मित्रपक्ष सहकार्य करत नसल्याचा आरोप करत माघार घेतली आहे. महायुतीच्या नेत्यांनी देखील बंडखोरांना शांत करण्यात यश मिळवले आहे. कोकण विधान परिषद मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला. तर नाशिकमध्ये गणेश गीते अर्ज माघार घेणार आहेत परंतु गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या असून शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि एका जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे.
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना)
यवतमाळ – दूष्यांत चतुर्वेदी ( शिवसेना)
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली – अरुण लखानी (भाजप)
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)
नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध गोकुळ गीते (अपक्ष)
सातारा -सांगली – धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
नागपूर – अतुल लोंढे (काँग्रेस) विरुद्ध डॉ. राजीव पोतदार (भाजप)
सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
नांदेड – रामदास पाटील (काँग्रेस) विरुद्ध अमर राजूरकर (भाजप)
भंडारा – गोंदिया – नरेश ईश्वरकर (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध दिलीप बनसोड (काँग्रेस)
अमरावती – प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध हर्षजीत देशमुख (काँग्रेस) विरुद्ध निलेश विश्वविक्रमा (वंचित)
परभणी हिंगोली – सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (शिवसेना उबाठा)
धाराशिव – लातूर – बीड – बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (शिवसेना उबाठा)
छत्रपती संभाजीनगर – सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (शिवसेना उबाठा)






