महायुतीतून शिंदे सेनाला बाहेरचा रस्ता
गोंदिया : आगामी काळ निवडणुकांचा आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी पक्षबांधणीवर भर दिला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी 29 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी महाआघाडी आणि महायुतीने फिल्डिंग लावली आहे. त्यातच महायुतीतील घटकपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी (दि.28) बैठक घेत सहकार पॅनल तयार केले. मात्र, महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा बैठकीत एकही सदस्य उपस्थित नव्हता. त्यामुळे शिवसेनेला महायुतीने बाहेरचा रस्ता तर दाखवला नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे. या बँकेची निवडणूक गेल्या 11 वर्षांपासून झालेली नव्हती. त्यामुळे तेच पदाधिकारी कायम होते. आता मात्र सहकार विभागाने या बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, येत्या 29 जून रोजी 20 संचालकपदासाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक तोंडावर आली असताना आता राजकीय पक्षांनी देखील मोर्चेबांधणीला सुरूवात केली. महायुतीने बाजी मारत बुधवारी (दि. 28) राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षानी युती करत सहकार पॅनलच्या नावाने निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
या युतीची घोषणा भाजप जिलाध्यक्षा सीता रहांगडाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार भेरसिंग नागपुरे व भाजपचे संघटन सचिव बाळा अंजनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे राज्यात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेची जिल्ह्यात सहकार क्षेत्रात ताकद कमी आहे. मात्र, घटकपक्ष म्हणून सहकार पॅनेलमध्ये शिवसेना सुद्धा राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता.
सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था
सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था म्हणून जिल्हा बँकेकडे बघितले जाते. या बँकेवर दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. अद्यापही राष्ट्रवादीचेच अध्यक्ष आणि सचिव आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्रावर त्यांची चांगली पकड आहे. मात्र, आता भाजपने देखील कंबर कसली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस समर्थित उमेदवार देखील मैदानात उतरणार असल्याने यावर्षीची जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत बाजी कोण मारतो, जिल्ह्याचा सहकार महर्षी कोण ठरतो, हे येत्या 30 जूनला कळणार आहे.