कुणाल कामरा याच्या कवितेवर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राज्यामध्ये सध्या कुणाल कामरा या कॉमेडियनवरुन राजकारण रंगले आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचा उल्लेख करत कवितेमधून जोरदार टीका केली. मात्र यामुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने कुणाल कामराच्या कार्यालयाची तोफफोड केली आहे. यावरुन मात्र ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ शेअर करुन महायुतीवर निशाणा साधला आहे.
कुणाल कामरा या कॉमेडियनने एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. हे प्रकरण एका कवितेवरुन सुरु झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ शेअर करुन पुन्हा एकदा या कवितेच्या ओळी गायल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी त्याच चालीमध्ये पुन्हा तिच कविता गाऊन दाखवली आहे. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर सुषमा अंधारे यांनी महायुतीला काही प्रश्न देखील विचारले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, कवितेचे बोल ऐकून चिडचिड होत आहे का? यावर तोडफोड होत आहे? जेव्हा भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती? आपटेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा आपटेचे कार्यालय का नाही फोडले? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा सोलापूरकरचे कार्यालय किंवा तो ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते का फोडले नाही? प्रशांत कोरटकर याने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोहचण्याची भाषा केली, तेव्हा प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाही? एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या. आता एखादा कलाकार अत्यंत उपाहसाने सत्य परिस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत? व्ही सपोर्ट कुणाल कामरा, असे स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
या प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, “राजकारणातील लोकांवर सर्वच टीका करतात. ती सहन केली पाहिजे. बाळासाहेबांनी आणि शरद पवार यांनी टीका सहन केली. अगदी विलासरावांनी देखील टीका सहन केली. मात्र मोदींचं सरकार आल्यापासून टीका सहन करायची नाही ही परंपरा पडली. आम्ही लेखक, पॉडकास्ट करणाऱ्यांच्या मागे आम्ही आहोत. मर्यादा पाळल्या पाहिजे. पण व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नये. विधिमंडळात जे चाललंय ते पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. त्यावर बंधन आहे का. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग लेखक, कलावंतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य का नाही?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.