कुणाल कामरा वादग्रस्त कवितेवरुन वाद निर्माण झाल्यानंतर संजय राऊत संतापले (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारी कविता सादर केली. यामध्ये त्याने एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र यामुळे त्यांच्या पक्षातील आक्रमक कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. यामुळे हे प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. कुणाल कामराच्या मदतीसाठी ठाकरे गट धावून आला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केल्यामुळे शिंदे गटावर जोरदार टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, “आचार्य अत्रे यांची झेंडूंची फुले वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग होतंच असतं. नाही तर बाळासाहेब ठाकरे जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. राजकारणातील लोकांवर सर्वच टीका करतात. ती सहन केली पाहिजे. बाळासाहेबांनी आणि शरद पवार यांनी टीका सहन केली. अगदी विलासरावांनी देखील टीका सहन केली. मात्र मोदींचं सरकार आल्यापासून टीका सहन करायची नाही ही परंपरा पडली. आणीबाणीतही असं घडलं नाही. अशा टोकाच्या भूमिका कोणी घेतल्या नव्हत्या. फडणवीस यांनी तात्काळ दंगलखोरांवर कारवाई करावी. दंगलखोरांकडूनच रक्कम वसूल केली पाहिजे,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी घडलेल्या हा प्रकार मुंबईमध्ये घडला असल्यामुळे पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीकास्त्र डागलं आहे. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृहखातं चालवणं झेपत नाही, हे स्पष्ट दिसतं. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे. काय केलं त्यांनी? हा संपूर्ण कट दीड दोन तास आधी शिजला. काय करत होते मुंबईचे पोलीस. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार झाला, त्या पोलीस स्टेशनचे एसीपी, सीनिअर पीआय यांच्यावर ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत देशात आपल्या राज्याची नाचक्की होत आहे. आपले गृहमंत्री भाषणं आणि प्रवचनं देत फिरत आहेत. कुणाल कामराला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे कोण लोकं आहेत? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी कलाकारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आम्ही लेखक, पॉडकास्ट करणाऱ्यांच्या मागे आम्ही आहोत. मर्यादा पाळल्या पाहिजे. पण व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नये. विधिमंडळात जे चाललंय ते पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. त्यावर बंधन आहे का. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग लेखक, कलावंतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य का नाही?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.