shivsena thackeray group leave congress for raj thackeray alliance for BMC Elections 2025
BMC Elections 2025: मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गट शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज-उद्धव यांच्या युतीमुळे मात्र कॉंग्रेस खुश नसल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेसने यावर अनेकदा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या युतीबाबत कॉंग्रेसच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुंबई महापालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मित्र पक्षाने वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आमच्याकडून आमच्या मित्र पक्षांना, सहकाऱ्यांना अडचणीत येणारी भूमिका घेणार नाही. वक्तव्य करणार नाही. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची स्वतंत्र भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. अदानीच्या घशात मुंबई जाण्यापासून वाचवायची आहे, आतापर्यंत सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेस पक्ष सहभागी झालेला आहे. काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यापासून ते दिल्लीतील नेत्याचा निवडणूक आयोगाविरोधातील लढ्याला पाठिंबा आहे,, असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई महाराष्ट्राच्या हातात असायला हवी
पुढे ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईवेळी सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. संयुक्त महाराष्ट्रावेळी सर्व पक्ष मतभेद विसरून एकत्र आले होते. बिहारमध्ये राज ठाकरे नाहीत. तरीही काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचं वाजलं आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तरी त्यांच्यात जागा वाटपाचे भिजत घोंगडं आहे. तिथे राज ठाकरे अथवा उद्धव ठाकरे आहेत का? ठीक आहेत, अशी वक्तव्य होतात. पण मुंबई महाराष्ट्राच्या हातात असायला हवी ही आमची भूमिका आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी कॉंग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महापौरांचं काय घेऊन बसले हे महाशय
राज ठाकरेच काय महाविकास आघाडीसोबत देखील लढणार नाही असे वक्तव्य कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. याबाबत संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षातील मराठी नेतृत्वानं पुढील जे संकट आहे मुंबईवरील, त्यावर गांभीर्याने विचार करावा. आम्हाला जे बोलायचे ते आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलू. या चारही प्रमुख लोकांशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यावर उगाच आकांडतांडव करण्यात आधार नाही. ही लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची निकराची लढाई आहे हे काँग्रेसच्या नेत्यांनी गांभीर्याने समजून घेतले पाहिजे. आम्हाला काँग्रेसचाच पंतप्रधान करायचा होता. पण नाही होऊ शकला. इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी होता. आमचं मन फार मोठं आहे. आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे, मुबंईच्या महापौरांचं काय घेऊन बसले हे महाशय. मुंबईचेच नाही तर 27 महापालिकेचे महापौर काँग्रेसनं करावं. महापौर मराठी होणं याला आमचं प्राधान्य आहे, अशी भूमिका देखील संजय राऊतांनी घेतली.