'अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान'; ओला दुष्काळ जाहीर करण्याची पटोलेंची मागणी (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, पुरेशा मदतीअभावी बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर आणि केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली आहे. जमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. परंतु, सरकार नियमांच्या नावाखाली त्यांना मदत देण्यास टाळाटाळ करत आहे. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, आज सत्तेत असताना आता ते नियम सांगतात.
हेदेखील वाचा : New GST Rates : “राजा व्यापारी तिथली जनता भिकारी…; नाना पटोले यांचा नवीन GSTवरुन भाजपला टोला
दरम्यान, राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे. केंद्र आणि राज्यात डबल इंजिनचं सरकार असूनही मदत का मिळत नाही?, शेतकरी, मजूर, बेरोजगार आणि सामान्यांसाठी हे सरकार फेल ठरले आहे. पण धनदांडग्यांसाठी हे सरकार धावतं. मग हे सरकार नक्की कुणाचे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
डबल इंजिन सरकार फेल
तसेच ते पुढे म्हणाले, ‘हे डबल इंजिनचे सरकार शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांसाठी फेल ठरले आहे. मात्र, हे सरकार धनदांडग्यांसाठी नेहमीच तत्पर असते’, असा आरोपही पटोले यांनी केला आहे.
जीएसटीवरून पटोलेंचा निशाणा
दुसरीकडे, केंद्र सरकारकडून जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे केवळ जीएसटीचे केवळ दोन स्लॅब असणार आहेत. हे नवीन स्लॅब लागू झाले असून यामध्ये केवळ 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन स्लॅब असणार आहेत. यामुळे अनेक वस्तू या स्वस्त झाल्या आहेत. मात्र यापूर्वी मोदी सरकारकडून असलेल्या स्लॅबमुळे मोठे नुकसान झाले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे.