एसीबीने मंत्रिमंडळातील लिपीकावर कारवाई केल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
एसीबीने रंगेहात लाच घेताना पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय सील केले आहे. या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे कार्यालय सील करण्यात आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या लिपिकाने सुरुवातीच्या चौकशीत काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा आहे. ज्यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोललं जात आहे. यामुळे नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे.
हे देखील वाचा : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल
या प्रकरणावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.
नेमकं प्रकरण काय?
एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यापैकी ३५ हजार रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचला. यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेताना रंगेहात पकडले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : “तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात
मंत्रालयात एसीबीने कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारमध्ये राजेंद्र दर्डा यांच्या कार्यालयावर अशी कारवाई झाली होती. त्यानंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकावर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाली होती. आता नरहरी झिरवाळ हे तिसरे मंत्री ठरले असून त्यांच्या कार्यालयात थेट एसीबीने धडक दिली आहे.






