
Uday Samant
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठं योगदान आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंबाबत गैरसमज करुन घेऊ नका, असे आवाहन शिवसेना मंत्र्यांनी आज मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना केले. मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज फोनवरुन मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी मंत्री सामंत यांनी जरांगे पाटील यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्या उपसमितीपुढे मांडू, असे आश्वासन दिले.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठा जात प्रमाणपत्राविषयी जरांगे पाटील यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासमोर मांडू तसेच मराठ्यांच्या रद्द केलेल्या चार नोंदींविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करु. मराठ्यांच्या जात प्रमाणपत्रांबाबत बैठका घेण्याचा कोणताही आदेश शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला नाही. या बैठकांविषयी माहिती घेतली जाईल, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
मंत्री प्रताप सरनाईक यांनीही मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेबाबत आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्याशी बुधवारी विविध विषयांवर चर्चा केली होती, त्यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते. तसेच धाराशिव जिल्ह्यातील मराठा भवन व एसटीशी संबधित प्रश्नांबाबत चर्चा करताना आपलेही कौतुक केले होते, मात्र २४ तासांत काय झालं माहित नाही, असे मंत्री सरनाईक म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. मराठा समाजाबाबत शिवसेना पक्ष कटिबद्ध असून दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे यांची ओळख आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा गैरसमज झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावेत, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे नक्की कारवाई करतील, असे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्यभरातून लोक भेटायला येतात. सरकारमध्ये एका महत्वाच्या पदावर असल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकावे लागते. त्यामुळे जरांगे यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत गैरसमज झाला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी जर काही बैठका घेतल्या असतील तर त्याचे पुरावे जरांगे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे द्यावेत ते त्यावर नक्की कारवाई करतील, असे खासदार म्हस्के म्हणाले.
‘माझी नार्को टेस्ट करा,’ मनोज जरांगे यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मराठा समाज आणि मराठा बांधवांसाठी वेळोवेळी कोण उभ राहिलंय याची सर्वांना जाणीव असून मनोज जरांगे यांनाही याची कल्पना आहे, असे खासदार म्हस्के यांनी सांगितले. जरांगे हे नेहमीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असतात. काही गैरसमज असतील तर ते कधीही फोन करुन त्यांना सांगू शकतात ते गैरसमज उपमुख्यमंत्री शिंदे दूर करतील, असा विश्वास खासदार म्हस्के यांनी व्यक्त केला.