chandrashekhar bawankule reaction on manoj jarange
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता बावनकुळे यांनी प्रथमच यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आरोप फेटाळताना त्यांनी, “माझी नार्को टेस्ट करता येईल, त्यासाठी माझी पूर्ण परवानगी आहे,” असे स्पष्टपणे सांगितले.
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तोफ डागली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
बावनकुळे म्हणाले की, “जात पडताळणी विभाग हा अर्ध-न्यायिक (Quasi-Judicial) स्वरूपाचा असून त्याच्या कामकाजात कोणत्याही मंत्री किंवा लोकप्रतिनिधीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कोणताही मंत्री जात पडताळणी समितीला फोन करून निर्णय बदलू शकत नाही. अशा प्रकारचा हस्तक्षेप कायद्याने शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर थेट प्रतिक्रिया देताना, “जर कोणाला जात पडताळणी समितीच्या निर्णयाबाबत अन्याय झाल्याचे वाटत असेल, तर संबंधित व्यक्तीने उच्च न्यायालयात दाद मागावी. समितीच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची कायदेशीर व्यवस्था उपलब्ध आहे. न्यायालयात जाऊन स्टे किंवा अन्य दिलासा मिळवता येऊ शकतो,” असे त्यांनी नमूद केले.
जात पडताळणीसंदर्भातील निर्णय का घेतले जातात, कोणती प्रमाणपत्रे रद्द झाली आणि त्यामागील कारणे काय आहेत, याची माहिती संबंधित समितीकडे उपलब्ध असल्याचेही बावनकुळे म्हणाले. यासंदर्भातील आकडेवारी अधिकृत संकेतस्थळावर पाहता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप करत काही नवीन कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा केला होता. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित नोंदी रद्द करण्यासाठी आदेश दिल्याचा आरोप केला होता. तसेच काही प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांसोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती.
या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी आपण जरांगे यांचे संपूर्ण वक्तव्य ऐकले नसल्याचे सांगितले. मात्र, जात पडताळणीसारख्या अर्ध-न्यायिक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप शक्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यामुळे मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि जात पडताळणीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.






