
Uday Samant
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली. आता याच मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत म्हणाले की, सुनील तटकरे यांच्या आधीच्या आणि अलीकडच्या पत्रकार परिषदांमधील वक्तव्यांमध्ये काहीशी तफावत जाणवते. यापूर्वी त्यांनी विलिनीकरणाबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार होतं, असं ते सांगत आहेत. त्यामुळे या विषयावर आपण अधिक काही बोलणार नसल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं. (NCP Merger)
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, की मी शिवसैनिक आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मी कसं काय बोलू शकतो? कोण कोणामध्ये विलीन होणार आहे, याचीही मला माहिती नाही. हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे.
या विषयावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांनीच भूमिका स्पष्ट करावी, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ती खरी दिवाळी ठरेल, असं विधान केलं होतं. यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.
रघुवंशी यांचं हे वैयक्तिक मत असून त्याला शिवसेनेची अधिकृत भूमिका समजू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या भूमिकेबाबत फक्त एकनाथ शिंदेच बोलू शकतात, असंही सामंत म्हणाले.
त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचं चित्र आहे.
Ans: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगत हा दोन्ही राष्ट्रवादी गटांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
Ans: अजित पवार असते तर 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं असतं आणि त्यांनी याबाबत आपल्याला कल्पना दिली होती, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.
Ans: आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं विधान वैयक्तिक मत असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. शिवसेनेबाबत अधिकृत भूमिका एकनाथ शिंदेच मांडू शकतात, असंही ते म्हणाले.