
उदय सामंत यांची उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका (Photo Credit- X)
मंत्री उदय सामंत म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सव्वाचारशेहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. महाराष्ट्रातल्या मतदारांचे मी आभार मानतो. जिथे आम्ही कमी पडलो तिथे आम्ही निश्चितपणे आत्मचिंतन करू आणि आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करू, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या निकालांवर बोलताना सामंत म्हणाले की, मुंबईत जे विरोधाचे वातावरण तयार केले गेले होते, त्याला मुंबईकरांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईकरांनी केवळ विकासाला साथ देत महायुतीला मतदान केले आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार हे आता निश्चित आहे. महापौरपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित निर्णय घेतील. आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महापौर पदावर बसवला जाईल.
Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधताना सामंत म्हणाले, “ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, म्हणूनच त्यांना कुठेही सत्ता मिळवता आली नाही. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारलेले नाही. त्यांची अवस्था सध्या ‘गिरे तू भी टांग उपर’ अशी झाली आहे. ते ओढूनताणून आपली बेरीज १२० पर्यंत नेत आहेत आणि खोटं रेटून बोलत आहेत.”
मनसेच्या कामगिरीवर भाष्य करताना सामंत यांनी खळबळजनक दावा केला. मी आधीच सांगितले होते की या निवडणुकीत सर्वात जास्त फटका मनसेला बसेल. मनसेच्या जिवावर उबाठा पुन्हा छाती फुलवून उभी राहिली आहे. राज ठाकरेंच्या संवेदनशील स्वभावाचा आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्याचा वापर करून उबाठाने त्यांच्यावर भावनिक जाळं टाकलं आणि त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं. मनसेच्या मतांच्या गॅपचा उपयोग करूनच उबाठाच्या जागा वाढल्या आहेत.
बाळासाहेबांच्या स्वप्नांना विरोध करणाऱ्या ‘मामू’चा विजय झाल्याचा उल्लेख करत सामंत म्हणाले की, “बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेब प्रयत्न करत असताना ज्याने विरोध केला तो ‘मामू’ निवडून आला, यावरून उबाठाची खरी भूमिका महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाली आहे.” एमआयएमच्या नगरसेवकांबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, लोकशाहीत कोणी कोणाला मतदान करावे हा त्यांचा भाग आहे, परंतु यातून अनेकांनी बोध घेतला पाहिजे.
Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…