
मतदान की थट्टा? मतदार याद्यांचा घोळ आणि पुसली जाणारी शाही; राजनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल (Photo Credit - X)
वांद्रे येथील कलानगर भागात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नऊ वर्षांनी मुंबईची निवडणूक होतेय, मग मधल्या काळात निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता? ते पगार कसला घेतात याचा आता खुलासा झाला पाहिजे,” असा सवाल त्यांनी केला.
बोटावर लावलेली शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारींवर बोलताना ते म्हणाले की, आता निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रोज आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन ते काय काम करतात, यावर लक्ष ठेवले पाहिजे.
राज ठाकरे यांनीही प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली. मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला. “आजवर शाई लावली जायची, आता मार्कर का वापरताय? सॅनिटायझर लावलं की ती शाई निघून जातेय. मतदान करा, शाही पुसा आणि पुन्हा मतदान करा, हाच विकास आहे का?” असा खोचक सवाल त्यांनी विचारला.
PADU नावाचे नवीन यंत्र मतमोजणीसाठी वापरले जाणार असल्याच्या चर्चेवरून त्यांनी संशय व्यक्त केला. हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवण्यात आलेले नाही, मग लोकशाहीत स्पष्टता कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गोंधळ आणि तक्रारी असल्या तरी नागरिकांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले आहे. शहरातली आणि देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
Akola Election : 30 मतदारांचे नाव मतदान यादीतून गायब; अकोल्यात मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार