भाजप नेते आशिष शेलार यांनी महेश मांजरेकर यांच्यावर ठाकरे बंधूंची मुलाखत घेतल्याने टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
BJP on Mahesh Manjrekar : मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे, मुंबईवर वर्चस्व कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीची राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत समोर आली आहे. ठाकरे बंधूंची खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली. मात्र मांजरेकर यांनी मुलाखत घेतल्यामुळे त्यांच्यावर भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे.
ठाकरे बंधूंच्या या एकत्रित मुलाखतीवर भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. तर या मुलाखतीमध्ये भाजपवर ठाकरे बंधूंनी टीकास्त्र डागले. त्याचबरोबर सामान्य मुंबईकरांच्या समस्य़ा मांडण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर हे देखील उपस्थित होते. महेश मांजरेकर यांनी सदर मुलाखतीमध्ये सामान्य मुंबईकरांना पडलेले प्रश्न मांडले. तसेच घरातून बाहेर पडताना लाज वाटते असे देखील महेश मांजरेकर म्हटले आहेत. यानंतर आता भाजपच्या निशाण्यावर मांजरेकर आले आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महेश मांजरेकरांनी राजकारणात पडू नये, असा दिला आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, “हे सगळी लोक फिल्मी लोक आहेत. दिवसरात्र सिनेमा बघायचे, परिवारासोबत फाफडा जिलेबी खायची, इतरांबरोबर गप्पा मारायच्या, त्यांचं मुंबईकरांशी काहीही घेणंदेणं नाही”, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : खासदार संजय राऊत अन् DCM एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
पुढे ते म्हणाले की, “त्यांचा मुंबईच्या विषयाशी काही संबंध आहे का?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “मुंबईकरांसाठी कधी ते रस्त्यावर उतरले आहेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले होते. तेव्हा कुणी बंगल्यावर किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होतं. हे दोन्ही भाऊ मुंबईच्या पुराव्यावेळी 26 जुलै रोजी इतरांसाठी कुठे दिसले होते का?”, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षे का लागली? राज-उद्धव यांची बेधडक संयुक्त मुलाखत चर्चेत
आशिष शेलार यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “महेश मांजरेकर हे एखाद्या पक्षाचा प्रचार करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण ते अभिनेता म्हणून आपण निष्पक्ष आहोत, असे दाखवून एखाद्या पक्षाचा प्रचार करणार असतील, तर मांजरेकरांनाही सडेतोड प्रत्युत्तर देऊ. त्यांनी अटल सेतू आणि कोस्टल रोडने प्रवास केला नाही का? त्यांना उपनगरीय रेल्वेतून फिरण्याची माहिती आहे का, ते अॅक्वा मेट्रोतून फिरलेत का? त्यामुळे महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये आणि पडायचं असेल तर त्यांना आम्ही दाखवू आता थांबायच नाय”, अशा शब्दांच त्यांच्याच चित्रपटाचे नाव घेऊन आशिष शेलार यांनी मांजरेकरांवर निशाणा साधला.






