
'धनुष्यबाण चिन्ह गोठवा,' उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
Uddhav Thackeray : शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईला आता उद्धव ठाकरे यांनी नवा मुद्दा समोर आणला आहे. सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाचा निकाल लागायला आणखी वेळ लागणार असेल, तर धनुष्यबाण निवडणूक चिन्हच गोठवून टाका, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं, यावर ठाकरे आणि शिंदे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाकडून आपली बाजू मांडली जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या लांबलेल्या सुनावणीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “या वादात जवळपास चार वर्षे गेली आहेत. या काळात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पार पडल्या आहेत. आम्हाला आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळायला पाहिजे. खरं म्हणजे या मागणीसाठी केस व्हायलाच नको होती,” असं म्हणत ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले की, “या प्रकरणाचा निकाल येण्यासाठी अजून वेळ लागणार असेल तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं. या चिन्हाचा वापर करून सत्ता मिळवण्यात आली आणि त्यानंतर गैरकारभार झाला,” असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सण-उत्सवांच्या काळात होणाऱ्या DJच्या गोंगाटावरही भाष्य केलं. सण-उत्सव सगळ्यांनाच हवेत; मात्र गोंगाट कोणालाही नको, असं ते म्हणाले. ठाकरेंच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. कारण सण साजरे करण्याचा उत्साह आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतून मोठ्या आवाजातील DJ आणि ध्वनिप्रदूषणावर निर्बंध घालण्याला त्यांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट होतं.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरूनही आपली भूमिका मांडली. महापुरुषांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो नको, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. या मुद्द्यावरूनही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे धनुष्यबाणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयातील लढाई सुरू असतानाच ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.
एकूणच, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी, DJ च्या गोंगाटावर घेतलेली भूमिका आणि महापुरुषांच्या प्रतिमांबाबत केलेलं विधान यामुळे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद चांगलीच चर्चेत आली आहे.