
विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी
Shivsena News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. जात पडताळणी समितीकडून त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. विशाखा राऊत यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिथूनही त्यांना अपेक्षित दिलासा मिळाला नाही. अखेर मुंबई महापालिकेच्या सभेत त्यांचं पद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.
इतकंच नाही, तर विशाखा राऊत यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून ओबीसी महिला राखीव जागेवर निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांच्याशी झाली होती.
Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा
ही निवडणूक अक्षरशः अटीतटीची ठरली. विशाखा राऊत यांना 13,326 मते, तर प्रिया सरवणकर यांना 13,039 मते मिळाली. म्हणजेच केवळ 197 मतांच्या फरकाने विशाखा राऊत यांनी विजय मिळवला होता.
विशाखा राऊत यांनी ओबीसी आरक्षित जागेवर निवडणूक लढताना कुणबी जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र, प्रिया सरवणकर यांनी या प्रमाणपत्राच्या वैधतेसह क्षेत्राधिकारावरही आक्षेप घेतला होता. त्यानंतर प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेलं.
तपासणीनंतर समितीने विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं. त्यानंतर त्यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होतं. या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली, पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही.
विशाखा राऊत यांचं पद रद्द झाल्याने मुंबई महापालिकेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या 65 वरून 64 झाली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाच्या संख्येत एका जागेची भर पडून ती 30 होणार आहे.
या संपूर्ण प्रकरणावरून विशाखा राऊत यांनी यापूर्वी राजकीय दबाव आणि कटकारस्थानाचा आरोप केला होता. सदा सरवणकर यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली होती. आता पद रद्द झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग आणखी चढण्याची शक्यता आहे.