
Maharashtra Breaking News Today 07.09.2026
07 Sep 2026 09:44 AM (IST)
Ola Driver Molestation Attempt: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर रात्रीच्या सुमारास एका महिला प्रवाशासोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवासादरम्यान ओला टॅक्सी चालकाने एका निर्जन रस्त्यावर गाडी थांबवून मागील सीटवर एकट्या बसलेल्या महिलेच्या जवळ जात तिचा हात पकडला आणि तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत विनयभंग करण्याचा कथित प्रयत्न केला.
या प्रसंगी महिलेने प्रसंगावधान राखत तीव्र विरोध केला आणि जोरदार आरडाओरड केली. महिलेचा प्रतिकार पाहून घाबरलेला आरोपी चालक तिला सोडून घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून पोलीस पसार झालेल्या चालकाचा शोध घेत आहेत.
07 Sep 2026 09:37 AM (IST)
Vishakha Raut Disqualification : मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या वॉर्ड क्रमांक १९१ च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ही कारवाई झाली असून, शनिवारी मध्यरात्री नगरविकास विभागाकडून याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली होती. आज सोमवारी महापालिका सभागृहात या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
विशाखा राऊत यांचे पद रद्द होणे हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिकेत आधीच विरोधी पक्षात असलेल्या ठाकरे गटाचे संख्याबळ आता ६५ वरून ६४ वर खाली आले आहे.
07 Sep 2026 09:30 AM (IST)
Pune DJ Ban Protest : विद्यानंद बापटांनी पुण्यात डीजे बंदीवरून आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच, आता डीजे आणि लाऊडस्पीकरच्या त्रासाविरोधात सामान्य पुणेकरही रस्त्यावर उतरले आहेत. 'लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचा'च्या नेतृत्वाखाली नागरिकांनी बालगंधर्व चौकात एकत्र येत शांततेत मोर्चा काढला.
"नागपुरात कायद्याला मान, सोलापुरात परंपरेचे भान, मग पुण्यातच लाऊडस्पीकरला का मोकळे रान?" असा थेट सवाल उपस्थित करत पुणेकरांनी डीजे संस्कृतीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने प्रशासनाने यावर कडक पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे
07 Sep 2026 09:23 AM (IST)
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत निवडून आलेल्या २५ नगरसेवकांविरोधात विविध कारणांमुळे तक्रारी दाखल झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारींवर मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर आज दुपारी सुनावणी होणार असून या सुनावणीसाठी प्रशासनाने ९ नगरसेवकांना रीतसर नोटीस बजावून उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी १७ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ९ नगरसेवकांच्या तक्रारींवर सुनावणी पार पडली असून, आजच्या सुनावणीनंतर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
07 Sep 2026 09:16 AM (IST)
Baghpat Bus Accident: उत्तर प्रदेशातील बागपत येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. राजस्थानहून बदायूं कडे परतणाऱ्या भाविकांची एक खासगी बस ‘ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे’वर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली आणि महामार्गावरच पलटी झाली. या दुर्दैवी अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडला तेव्हा बसमध्ये सुमारे ३२ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले आणि जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई व शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
07 Sep 2026 09:10 AM (IST)
Heavy Rainfall Warning Delhi to Maharashtra: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, देशातील हवामानावर अल निनोचा प्रभाव असल्याने वातावरणात सतत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आज दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने काही भागांत जोरदार वारे आणि वादळाची शक्यता वर्तवली आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ७० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा जोर असणार असला, तरी महाराष्ट्रात मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतली असून राज्यात उघडीप पाहायला मिळणार आहे.
आज ७ सप्टेंबर रोजी नेपाळमधील महापुरानंतर अब्जावधी डॉलरच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महाराष्ट्रात विविध सामाजिक आंदोलनांवरून राजकीय वातावरण तापले आहे आणि आशियाई बाजारातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारात सावध व्यवहार सुरू आहेत. राज्यातील आंदोलने, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरील प्रशासकीय नियोजन आणि स्थानिक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय वाद पेटला आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी हवामान विभागाने किनारपट्टी आणि घाटांच्या परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्लीतील इमारत दुर्घटनेच्या तपासासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इराण आणि मध्यपूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे जागतिक सुरक्षेबाबत विविध देशांनी सतर्कता वाढवली आहे.