महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ (फोटो- सोशल मिडिया)
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा आज कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात’ ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाव्दारे रोजगार मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री यांच्या हस्ते सहीदा परमाणिक यांना क्रेवा कॅपीटल सर्व्हिसेस प्रायवेट लिमीटेड बेलापूर व कांती शंभू चव्हाण यांना क्रेवा कॅपीटल सर्व्हिसेस प्रायवेट लिमीटेड कुर्ला येथील या कपंनीकडून नियुक्तीपत्र देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून कोकण व नाशिक विभागातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार आणि स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार ही त्रिसूत्री अत्यंत महत्वाची आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला ‘अंत्योदय’ आणि ‘एकात्म मानव दर्शन’ हा विचार समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधणारा आहे.याच विचारावर आधारित शासनाचे कामकाज सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मानव संसाधनाची निर्मिती हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, ज्याच्या आधारावर २०४७चा विकसित भारत आपण तयार करू शकणार आहोत. गरीबी मुक्त, बेरोजगारी मुक्त, रोगमुक्त भारत हे जे आपलं स्वप्न आहे. या स्वप्नाकडे जाण्याकरता खऱ्या अर्थानं शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारावर आपल्याला ही व्यवस्था उभी करायची आहे. आज देशातील ६५ टक्के लोकसंख्या ही कार्यक्षम युवाशक्ती आहे. एकीकडे उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे, तर दुसरीकडे तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे. या दोघांना जोडणारा भक्कम दुवा म्हणून हे रोजगार मेळावे काम करत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार युवकांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करावीत. युवकांना रोजगार देणारे आणि रोजगार शोधणारे यांच्यातील दुवा म्हणून रोजगार मेळावे महत्वाची भूमिका बजावतात.
आज महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे. कोकण व नाशिक विभागातील ४१८ ठिकाणी एकाच वेळी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून, एक लाखांहून अधिक युवक-युवती या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. हा केवळ ४१८ रोजगार मेळाव्यांचा उपक्रम नसून, महाराष्ट्रातील युवाशक्तीला रोजगाराच्या संधींशी जोडण्याच्या व्यापक संकल्पनेची सुरुवात आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या ‘अंत्योदय’ आणि ‘एकात्म मानव दर्शन’ या विचारांमध्ये समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचवण्याचा आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संदेश आहे. याच विचारांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार युवकांच्या कौशल्य विकास आणि रोजगारासाठी सातत्याने काम करत आहे. अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’च्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी शिक्षणासोबत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आजची युवा पिढी तंत्रज्ञानाशी परिचित आहे. बदलत्या काळानुसार तिला आवश्यक कौशल्य… pic.twitter.com/J6VU0Oi6wr — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) September 29, 2026
मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, आज रोजगार महाकुंभाची सुरुवात झाली आहे; हा शेवट नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक युवक-युवतीला रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देईपर्यंत आमचे प्रयत्न थांबणार नाहीत. महाराष्ट्राच्या युवाशक्तीला कौशल्य, संधी आणि रोजगाराशी जोडणे हीच आमची प्राथमिकता आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार या वेळी केवळ आयटीआयमधील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता सर्व स्तरांतील तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान तीन लहान रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. केवळ मेळावे न घेता, विद्यार्थ्यांना रोजगार मिळावेत यासाठी ७ दिवसांचे मोफत पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, आतापर्यंत ६१ हजार मुला-मुलींनी हे प्रशिक्षण घेतले आहे. या मेळाव्यासाठी १ लाखांपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली असून, किमान ७० टक्के तरुणांना रोजगार किंवा स्वरोजगाराशी जोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जेवढे पदवीधर बाहेर पडतील, तेवढे रोजगाराचे मार्ग निर्माण व्हावेत यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग कौशल्य विकास विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्राने आज आशियातील अव्वल गुंतवणूक केंद्र आणि देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. तरुणांना केवळ राज्यातच नव्हे, तर जगभरात कुठेही रोजगाराच्या संधी मिळाल्यास त्यांना आवश्यक भाषा व कौशल्य प्रशिक्षण देऊन परदेशात पाठवण्याची तयारी सरकारने केली आहे.
या कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागला, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राज्यभरातून ऑनलाईन व प्रत्यक्ष प्रणालीद्वारे हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
कोकण व नाशिक विभागात ४०० पेक्षा जास्त मेळावे
कोकण व नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक उद्योजक नियोक्त्यांनी आणि एक लाखांपेक्षा अधिक रोजगार इच्छुक युवक-युवतींनी रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केली आहे. सहभागी उद्योजकांकडून २५,००० पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्हानिहाय शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन व इतर संस्थांच्या समन्वयातून उमेदवार व नियोक्त्यांचे समन्वय करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कामगार विभाग, उद्योग विभाग, पणन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विद्यापीठे आणि औद्योगिक संघटना यांचे सहकार्य लाभले.
‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन
महिलांच्या रोजगार सहभागाला विशेष प्रोत्साहन
महिलांच्या रोजगार सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा विशेष महिला रोजगार इच्छुकांसाठी असून, महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योग, कंपन्या, सेवा क्षेत्रातील आस्थापना नियुक्ती आस्थापनांचा व्यापक सहभाग निश्चित करण्यात आला आहे. विविध ३६ उद्योजकांनी सहभाग नोंदवलेला असून स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय महामंडळांकडील योजनांची माहिती देणारे स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.






