(Photo - Social Media)
सोलापूर : मतदारयादीचे शुद्धीकरण (एसआयआर) ही निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षांत मतदार याद्यांचे अपेक्षित पद्धतीने शुद्धीकरण झाले नव्हते. त्यामुळे दुबार, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे याद्यांमध्ये कायम होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या शुद्धीकरण प्रक्रियेमुळे अशी नावे वगळली जात असून, भविष्यातील निवडणुका अधिक पारदर्शक होतील. या प्रक्रियेचा विशेषतः २०२९च्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना मोठा फायदा होईल, असा विश्वास भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी गुरुवारी सोलापुरात आले असता, होटगी रोडवरील हॉटेल बालाजी सरोवर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर भाष्य करताना महाडिक म्हणाले, कोणत्याही निवडणुकीचा आधार मतदार यादी असतो. अनेक ठिकाणी दुबार मतदार, मृत व्यक्तींची नावे तसेच स्थलांतरित मतदारांची नावे यादीत होती. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४ लाख ९१ हजार नावे वगळण्यात आली असून, एसआयआरचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, असा दावा महाडिक यांनी केला. या प्रक्रियेमुळे मतदारांची संख्या कमी होऊन मतदार यादी अधिक अचूक होईल. त्यामुळे भविष्यातील निवडणुका अधिक पारदर्शक पद्धतीने पार पडण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
पश्चिम बंगालमध्ये चुकीच्या आधारावर काही लोक निवडून येत होते. आता तसे होणार नाही. शुद्धीकरणानंतर केवळ पात्र आणि खरे मतदारच मतदार यादीत राहतील. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांना याचा मोठा लाभ होईल, असे महाडिक म्हणाले.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणीचे काम सुरू आहे. संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने काही जण भाजपमध्ये प्रवेश करताना दिसले, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असे सूचक वक्तव्यही महाडिक यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्र हा पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून भाजप आणि मित्रपक्षांची ताकद सर्वत्र वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वी भाजपचा एकही नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून येत नव्हता; आज अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आहे, असा दावा त्यांनी केला. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही, अशी टीकाही महाडिक यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर महाडिक यांनी भाष्य करणे टाळले.






