"जिल्हाप्रमुख हटाव शिवसेना बचाव"; शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा संताप
वसई । रविंद्र माने : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, अशातच आता शिवसेना ठाकरे गटात अतंर्गत आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. वसई विधानसभा मतदार संघातील ठाकरे गटातील वाद समोर आले आहेत. पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची हकलपट्टी करावी अशी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. आजवर शिवसेना तालुक्यात दुसऱ्या स्थानावर असून देखील तिकिट मिळालं नाही, याला सर्वस्वी जिल्हाप्रमुख कारणीभूत आहे, असं ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
वसई तालुक्यात काॅंग्रेस,जनता दलाची सत्ता होती,त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांची सत्ता आली.मात्र,या सर्व वेळी शिवससैनिकांनी सत्ताधा-यांविरुध्द लढताना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.छोट्याश्या शाखेपासून ते नगरपालिका आणि महापालिकेत नगरसेवक निवडणूक आणून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शिवसनेनेचा दबदबा निर्माण झाला होता.नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाने दुस-या क्रमांकाची मते मिळवली होती. तालुक्यात दुस-या क्रमाकांचा पक्ष असतानाही यंदाच्या विधानसभा निवडणूकीतून शिवसेना ठाकरे गट हद्दपार झाली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा-महायुतीकडून अमित ठाकरेंसाठी फिल्डिंग? सदा सरवणकरांना ‘ही’ ऑफर दिल्याची चर्चा, माहीममध्ये काय होणार?
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला वसई आणि नालासोपारा मतदार संघातून उमेदवारी देणं आवश्यक होतं. मात्र तालुक्यात कोणतीही सत्ता नसलेल्या आणी अनेक गट-तट असलेल्या काॅंग्रेसला तिकीट देण्यात आले आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांचे प्रतिनिधीत्व करताना माजी तालुका प्रमुख विनायक निकम यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे.आम्ही झेंडे मिरवायचे आणि सतरंज्या उचलायच्या का असा सवाल करत अशाच संतप्त पदाधिका-यांनी वसईत एक तातडीची बैठक घेतली विनायक निकम,शिरीष चव्हाण,किरण चेंदवणकर,विवेक पाटील,मिलींद खानोलकर, मिलींद चव्हाण,राजाराम बाबर,संजय गुरव,प्रथमेश राऊत,सुनील मुळये,एड.भरत पाटील,एड.अनिल चव्हाण असे दिग्गज या बैठकीला उपस्थित होते.
शिवसेनेच्या उमेदवाराला वसई आणि नालासोपारातून उमेदवारी द्यावी यासाठी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख आग्रही राहिले नाही. पक्षप्रमुखांची वारंवार भेट घेताना त्यांनी ज्येष्ठ पदाधिका-यांना विश्वासात घेतले नाही.त्यामुळे उमेदवारीची माळ काॅंग्रेसच्या गळ्यात पडली असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या पदाधिका-यांनी “जिल्हाप्रमुख हटाव शिवसेना बचाव” अशी मागणी उध्दव ठाकरे यांच्याकडे एका पत्रान्वये केली आहे.आजवर निवडणूकीत पराभव झाला असला तरी, उमेदवारी न मिळण्याची नामुष्की कधीही शिवसेनेवर ओढावली नव्हती.ती देशमुख यांच्या कार्यकालात ओढावली आहे.त्यामुळे जोपर्यंत जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही.त्यांना पायउतार करा आम्ही आघाडीचा धर्म पाळू अशी मागणी या सर्व पदाधिका-यांनी केली आहे.