गुहागरमध्ये भाजप पक्षाला मोठा विजय मिळाला असून ठाकरे गटाला धक्का बसला आहे (फोटो - सोशल मीडिया)
वरवेली : गणेश किर्वे : गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीने आपले वर्चस्व निर्माण केले. १० पैकी ९ पंचायत समिती जागांवर भाजपा शिवसेना युतीने सत्ता काबीज केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीने ५ पैकी तीन जागांवर विजय मिळवला. विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना शह देण्यात भाजपा यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक यावेळी युतीच्या माध्यमातून भाजपा व शिवसेना यांनी एकत्र लढवली. यामध्ये भाजपच्या वाट्याला पंचायत समिती निवडणुकीत दहा पैकी पाच जागा आल्या. यामध्ये भाजपाने आपले सर्व उमेदवार निवडून आणून १०० टक्के यश प्राप्त केले. तर जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या वाट्याला आलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर भाजपाला यश मिळवणे शक्य झाले. त्यामुळे या ठिकाणी भाजपाने पुन्हा आपले वैभव प्राप्त केल्याचे म्हटले जात आहे.
हे देखील वाचा : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार
गुहागर तालुका हा सुरुवातीला युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र युतीच्या विधानसभेच्या जागा वाटपात झालेल्या झालेल्या वादात युती तुटल्याचा फायदा भास्कर जाधव यांनी मिळवला. त्यानंतर याठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषद, नगरपंचायत व अनेक ग्रामपंचायतीत भास्कर जाधव यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांचे वर्चस्व मोडीत काढण्यात यश मिळवले असल्याचे दिसून येत आहे.
चारही जागांवर दणदणीत विजय सुरुवातीला येथील नगरपंचायतीत घवघवीत यश मिळवून आपला नगराध्यक्ष विराजमान केल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मागे वळून न पाहता आपला विजयी रथ पुन्हा जोमाने सुरू ठेवला. तब्बल १५ वर्षानंतर गुहागर पंचायत समितीवर युतीने आपली सत्ता काबीज केली आहे. यामध्ये भाजपाने आपल्या वाट्याला आलेल्या चारही जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला.
हे देखील वाचा : माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
तालुक्यात पक्षाला गतवैभव प्राप्तमाजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी निष्ठेने काम करत आपल्या कार्यकर्त्यांना धीर दिला. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. आमदार भास्कर जाधव यांचा झंझावात सुरू असताना देखील येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते न डगमगता प्रामाणिक काम करत राहिले. अखेर याच मेहनतीचे फळ चाखण्यास भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आता मिळत आहे. माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करत अखेर आपल्या पक्षाला गुहागर तालुक्यात गतवैभव प्राप्त करून दिले आहे.
आगामी काळासाठी विजयाची नांदी
गेली अनेक वर्षे या ठिकाणी भाजपाला पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणणे शक्य होत नव्हते. अनेक वेळा जी परिस्थिती विरोधकांवर आली आहे ती परिस्थिती भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनुभवली, मात्र पक्षाचे काम ठामपणे करत अखेर नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवण्यात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यशस्वी ठरले आहेत. भाजपचे हे यश आगामी काळासाठी विजयाची नांदी ठरले असून गुहागर तालुक्यात भाजपाला नवसंजीवनी देणारे आहे.






