
फोटो सौजन्य- pinterest
प्राचीन अहिरदेश, म्हणजेच आजचा खान्देश प्रदेश हा इतिहास, संस्कृती आणि प्राचीन मंदिरांच्या वैभवाने समृद्ध आहे. या भूमीवर अनेक राजवंशांनी राज्य केले असून त्यांनी उभारलेल्या मंदिरांमधून तत्कालीन स्थापत्यकला, शिल्पकला आणि धार्मिक परंपरांचे दर्शन घडते. अशाच ऐतिहासिक वारशाचे जतन करणारे एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे मुधाई देवी मंदिर. हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघळी गावाजवळ वसलेले आहे. गाव आकाराने लहान असले तरी त्याला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. गावाच्या अलीकडे एका छोट्याशा टेकडीवर हे प्राचीन मंदिर उभे असून, गावातच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील तीन महत्त्वपूर्ण शिलालेखांमुळे वाघळीला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या दोन्ही मंदिरांचे ऐतिहासिक मूल्य लक्षात घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) त्यांना संरक्षित स्मारकांचा दर्जा दिला आहे.
मुधाई देवी मंदिर काहीशा उंच टेकडीवर वसलेले असून आजही त्याच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहे. कालौघात मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली असली तरी त्यावरील अप्रतिम शिल्पकला आणि स्थापत्य वैशिष्ट्ये आजही अभ्यासकांना आकर्षित करतात. पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते हे मंदिर इ.स. ११५० ते १२०० या कालावधीत, म्हणजेच यादव राजवटीच्या काळात बांधण्यात आले असावे. यादवकालीन मंदिर स्थापत्यशैलीची अनेक वैशिष्ट्ये या मंदिरात स्पष्टपणे दिसून येतात. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची रचना अत्यंत सुबक आहे. यात अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे प्रमुख भाग आहेत. या सर्व भागांची आखणी अत्यंत प्रमाणबद्ध असून तत्कालीन वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर कोरलेल्या विविध देवतांच्या मूर्ती विशेष लक्ष वेधून घेतात. उत्तर बाजूस देवी चामुंडा तर पश्चिम बाजूस सूर्यदेव दक्षिण बाजूस श्री गणेश आहेत. या तिन्ही देवतांच्या स्थानक अवस्थेतील सुंदर प्रतिमा मंदिराच्या शिल्पवैभवात भर घालतात.
सभामंडपातील खांब आणि छतावरील सूक्ष्म कोरीव काम विशेष उल्लेखनीय आहे. दगडावर केलेली नक्षीकामाची कलाकुसर यादवकालीन शिल्पकारांच्या अद्वितीय कौशल्याची साक्ष देते.
मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार पाच शाखांनी बनलेले असून त्याला नंदिनी प्रकारची द्वारशाखा म्हटले जाते. द्वाराच्या ललाटबिंबाच्या वरच्या भागात नवग्रहांचे सुंदर अंकन करण्यात आले आहे.
गर्भगृहात सध्या गरुडावर आरूढ असलेली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुंदर मूर्ती विराजमान आहे. त्याचबरोबर येथे मुधाई देवीचा तांदळा प्रतिष्ठापित करण्यात आलेला आहे, ज्याची स्थानिक भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करतात.
मंदिराच्या स्थापत्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचे एक महत्त्वाचे मत असे आहे की हे मंदिर मूळत सूर्यदेवाला समर्पित असावे. यामागे काही कारणे सांगितली जातात. मंदिरावर सूर्यदेवाच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात आढळतात. अशी अनेक कारणे सांगितली जातात.. पण काही अभ्यासकांच्या मते परकीय आक्रमणांच्या काळात मूळ सूर्यप्रतिमेचा विध्वंस होऊ नये म्हणून ती सुरक्षित स्थळी हलविण्यात आली असावी. मात्र नंतर ती पुन्हा या मंदिरात प्रतिष्ठापित करता आली नाही. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी येथे मुधाई देवीचा तांदळा स्थापित केला असावा. हा निष्कर्ष उपलब्ध स्थापत्य पुराव्यांच्या आधारे मांडला जात असला, तरी त्याबाबत निश्चित ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.
वाघळी गावातील श्रीकृष्ण मंदिर देखील इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या मंदिरात आढळणारे तीन भव्य शिलालेख तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि धार्मिक जीवनावर प्रकाश टाकतात. त्यामुळे इतिहास संशोधक आणि पुरातत्त्व अभ्यासकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे.
मुधाई देवी मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्री उत्साहात साजरी केली जाते. या काळात मोठी यात्रा भरते आणि जळगावसह खान्देशातील विविध भागांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. धार्मिक विधी, देवीची आरती, भजन-कीर्तन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जातो.
मुधाई देवी मंदिर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. चाळीसगाव येथून वाघळीसाठी नियमित एसटी बस सेवा उपलब्ध आहे. भडगाव येथूनही वाघळीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस धावतात.
शांत, निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर अध्यात्म, इतिहास आणि स्थापत्यकलेचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी देते. खान्देशातील हा ऐतिहासिक ठेवा प्रत्येक इतिहासप्रेमी आणि मंदिरप्रेमीने आयुष्यात किमान एकदा तरी आवर्जून पाहावा, असेच म्हणावे लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मुधाई देवी मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर वाघळी गावाजवळ एका टेकडीवर वसलेले प्राचीन मंदिर आहे.
Ans: पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते, हे मंदिर इ.स. ११५० ते १२०० दरम्यान यादवकालात बांधले गेले असून, यादवकालीन स्थापत्यकला आणि शिल्पवैभवाचा उत्कृष्ट नमुना मानले जाते.
Ans: होय. मुधाई देवी मंदिर आणि वाघळीतील श्रीकृष्ण मंदिर या दोन्ही वास्तूंना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) संरक्षित स्मारकांचा दर्जा दिला आहे.