फोटो सौजन्य- gemini
गणपतीची धामधूम संपून आज 27 सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे. मृत्यूनंतर माणसाचं काय होतं? शरीर सोडल्यानंतरही भूक आणि तहान लागते का? श्राद्ध करताना अन्न आणि पाणी अर्पण करण्याच्या परंपरेमागे नक्की काय कारण आहे असे प्रश्न लोकांच्या मनात अनेकदा येतात. हिंदू धर्मात गरुड पुराणाद्वारे भगवान विष्णूंनी स्वतः त्यांचे वाहन गरुडाशी संवाद साधताना अशा अनेक प्रकारची उत्तरे दिली आहेत. मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण यामागील कारण जाणून घेणार आहोत
श्राद्ध हा शब्द श्रद्धा या शब्दांवरून आला आहे. ज्याचा अर्थ पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणं असा आहे. गरुड पुराणानुसार श्राद्धाच्या वेळी त्यांना अर्पण केलेला नैवेद्य त्यांना वर्षभरात सूक्ष्म स्वरुपात संतुष्ट करतो. त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख शांती आणि समृद्धी व संततीचा आशीर्वाद देतात असा समज आहे.
पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी देखील तर्पण केलं जातं. कुशा गवत, काळे तीळ आणि जव हातात घेऊन पाण्यासोबत पूर्वजांना अर्पण केले जातात. गरुड पुराणानुसार अशा प्रकारे त्यांना अर्पण केलेलं पाणी त्यांची तहान भागवते. मोक्ष प्राप्तीसाठी किंवा आत्म्याच्या पुढील प्रवासाला मदत करण्यासाठी गया, हरिद्वार, प्रयागराज इत्यादी तीर्थक्षेत्रावर पिंडदान केलं जातं. यामुळे दिवंगत आत्मा भौतिक बंधनातून आणि आसक्तीतून मुक्त होतो असा समज आहे.
अनेक ठिकाणी असा विश्वास आहे की पिंडदान केल्यानंतर पूर्वजांसाठी किंवा मृत व्यक्तीसाठी श्राद्ध करण्याची किंवा तर्पण करण्याची गरज उरत नाही.
गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीर सोडून यमलोकांच्या खडतर प्रवासाला निघतो तेव्हा त्याला भूक आणि तहान लागते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला उर्जेची गरज असते जी त्याला त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या पिंडदानातून मिळते म्हणूनच मृत्यूनंतर दहा दिवस पिंड अर्पण केल्याने आत्म्याला यमलोकांचा लांबचा प्रवास पार करण्याची शक्ती मिळते.
त्यामुळे मृत्यूनंतर 13 दिवस हे विधी दररोज केले जातात. इतकेच नाही तर गरुड पुराणानुसार 13 व्या दिवसानंतरही पितृलोकात निधन पावलेल्या लोकांना संतुष्ट करणं आवश्यक असतं. म्हणूनच पितृपक्षात दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी कुटुंबातील सदस्य तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात. गरुड पुराणानुसार, हे विधी केवळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठीच नाही तर त्यांचे ऋण फेडण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुखद होण्यासाठी केला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






