फोटो सौजन्य- istock
यंदा राधाष्टमी शनिवार, १९ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. भाद्रपद शुक्ल अष्टमीला राधाष्टमी साजरी केली जाते. यंदा अष्टमी तिथीची सुरुवात १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शनिवार, १९ सप्टेंबर दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी समाप्त होत आहे.
राधाष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील देव्हाऱ्यात श्रीराधा-कृष्णाची पूजा केली जाते. काही परंपरांमध्ये राधाराणीची विशेष पूजा मध्यान्हकाळात केली जाते. उपवास करण्याचीही प्रथा आहे; मात्र उपवासाची पद्धत कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकते. या दिवशी राधा-कृष्णाला फुले, फळे, मिठाई आणि नैवेद्य अर्पण करून आरती केली जाते. भक्त राधा-कृष्णाचे नामस्मरण आणि भजन-कीर्तन करतात.
राधाष्टमी हा श्रीराधेच्या जन्मोत्सवाचा दिवस मानला जातो. राधा ही कृष्णावरील उत्कट प्रेम, समर्पण आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. वैष्णव परंपरेत राधा-कृष्णाची युगल उपासना विशेष महत्त्वाची आहे. राधेच्या भक्तीमध्ये कोणतीही अपेक्षा नसून कृष्णाशी असलेले तिचे नाते हे प्रेम आणि समर्पणाचे आदर्श रूप मानले जाते. त्यामुळे राधाष्टमीच्या दिवशी भक्त श्रीराधेचे स्मरण, पूजा, नामस्मरण आणि उपवास करतात.
राधेला कृष्णाची सर्वाधिक प्रिय गोपी आणि आदर्श भक्तीचे प्रतीक म्हणून विविध वैष्णव परंपरांमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. मराठी विश्वकोशानुसार राधेच्या भक्तीपरंपरेच्या विकासात पुराणे आणि जयदेवाचे गीतगोविंद यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुढे राधा-कृष्णाच्या उपासनेला विविध वैष्णव संप्रदायांमध्ये विशेष स्थान मिळाले. राधा म्हणजे केवळ कृष्णाची प्रेयसी असे एकांगी स्वरूप नसून, कृष्णभक्तीतील प्रेम, विरह, समर्पण आणि भक्तिभावाचे प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.
महाराष्ट्रात राधाष्टमीचा उत्सव वैष्णव आणि कृष्णभक्तीच्या परंपरेशी जोडलेला आहे. मंदिरांमध्ये राधा-कृष्णाची विशेष पूजा, अभिषेक, भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. काही कुटुंबांमध्ये घरी राधा-कृष्णाची पूजा करून उपवास केला जातो. नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन (ISKCON) मंदिरातही १९ सप्टेंबर रोजी राधाष्टमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेत कृष्णभक्तीला महत्त्वाचे स्थान असल्याने राधाष्टमी हा दिवस राधेच्या प्रेमभक्तीचे स्मरण करण्याचा आणि राधा-कृष्णाचे नामस्मरण करण्याचा दिवस मानला जातो.
राधाष्टमीचा उत्सव निःस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व अधोरेखित करतो. राधेचे कृष्णावरील प्रेम हे भक्तीचे आदर्श रूप मानले जाते. त्यामुळे या दिवशी केवळ विधी न करता मनापासून राधा-कृष्णाचे स्मरण करणे, भजन-कीर्तन करणे आणि भक्तीभाव जोपासणे याला विशेष महत्त्व दिले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






