ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तीन चक्रीवादळांची शक्यता
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. पुणे शहर आणि परिसरात पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले. त्यात ऑक्टोबर महिना सुरु होण्यापूर्वीच आता उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. नैर्ऋत्य मान्सूनही 19 सप्टेंबरपासून माघारीचा टप्पा गाठत आहे. पश्चिम राजस्थानातून सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला तो महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यामुळे राज्यात परतीचा मान्सून चांगला बरसू शकतो.
सध्या अल निनोमुळे मान्सून हंगाम बहुतांश भागात खूप कमी पावसाचा गेला. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात तीन चक्रीवादळांची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या संक्रमण काळात, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील कमी दाब प्रणालीच्या विकासासाठी अनुकूल होऊ शकते. ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान उत्तर हिंद महासागरावर तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची शक्यता आहे. स्पेस ॲप्लिकेशन सेंट, इस्रो, मोसडॅकद्वारे संयुक्तरीत्या हा अंदाज नुकताच देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात 22 सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोर राहील. कोकण, विदर्भात तुलनेने कमी पाऊस राहील. राजस्थानातून परतीच्या पावसाला अनुकूल स्थिती होत आहे, तेथे 19 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस
महाराष्ट्रात १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.५ टक्के पाऊस झाला, म्हणजेच सरासरीपेक्षा १६.५ टक्के कमी पाऊस झाला. दीर्घकाळच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला .
पाणीटंचाईची धास्ती
राज्यभरात पावसाने मोठा खंड दिल्याने संभाव्य पाणीटंचाईची धास्ती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी भूजल उपशावर निर्बंध घालण्याचे निर्देश शासनाने दिले असून, त्याची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यातही होणार का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑक्टोबरपासून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करून टंचाई कृती आराखडा निश्चित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार






