फोटो सौजन्य- istock
श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्य असतात. यंदा श्रावणात 5 सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामूठ महादेवाला अर्पण केली जाते. 12 ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी हे जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- तुम्ही वापरत असलेलं मध भेसळयुक्त नाही ना? जाणून घ्या सोप्या टिप्स
भगवान महादेवांनी कामासूरावर विजय मिळवला होता, तसे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो, असे म्हटले जाते.
दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहवी
आज 12 ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहिली जाते, त्याचप्रमाणे शंकराला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते.
हेदेखील वाचा- बाजाराची नाही, तर स्वतःच्या हाताने राखी बनवायची आहे का? घरच्या घरी राखी कशी बनवायची जाणून घ्या
श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.
शिवपूजन कसे करावे
प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. श्रावणी सोमवारी उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रोच्चारासह यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळाची शिवामूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ हा मंत्र म्हणावा.
शिवामूठ व्रत करण्याची पद्धत
विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावणी सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्या सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्ष क्रमवार हे व्रत केले जाते.