Gold Price Drop : सोन्याची किंमत ₹१५,००० ने घसरली... युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Gold price drop after Iran US deal 2026 : जागतिक राजकीय पटलावरून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. इराण आणि अमेरिका (US-Israel Iran War) यांच्यातील अनेक महिन्यांचा लष्करी तणाव अखेर एका ऐतिहासिक शांतता करारानंतर निवळला आहे. या मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा थेट आणि प्रचंड परिणाम भारतासह जागतिक सराफा बाजारावर झाला आहे. युद्धजन्य परिस्थिती संपताच भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत तब्बल १५,००0 रुपयांपर्यंतची ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे. यामुळे सामान्य ग्राहक आणि लग्नकार्यासाठी सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या घसरणीमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धाचा आणि शांततेचा सोन्याच्या दराशी नेमका काय संबंध असतो?
वास्तविक पाहता, सोने हा केवळ एक अलंकार किंवा दागिना नाही, तर ते जागतिक अर्थव्यवस्थेत “सर्वोच्च विश्वासाचे प्रतीक” मानले जाते. जेव्हा जेव्हा जगात युद्ध किंवा मोठे संकट येते, तेव्हा सोन्याच्या किमती वाढू लागतात. हे समजून घेण्यासाठी जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. युद्धाच्या काळात लोकांना आपल्या भविष्याची आणि आर्थिक सुरक्षेची काळजी वाटू लागते. अशा वेळी जागतिक शेअर बाजार कोसळतात, मोठ्या कंपन्यांचे व्यवसाय ठप्प होतात आणि जगभर महागाई वाढते. जेव्हा कागदी चलन, शेअर्स आणि बॉण्ड्समधील जोखीम वाढते, तेव्हा मोठ्या वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. सोन्याला आर्थिक भाषेत ‘Safe Haven’ म्हणजेच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. जेव्हा जगभरातून सोन्याची मागणी अचानक वाढते, तेव्हा साहजिकच त्याचे भाव गगनाला भिडतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार
अनेकांना वाटू शकते की भारत मोठ्या प्रमाणावर इराणकडून सोने आयात करतो की काय? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. भारताचा आणि इराणचा सोन्याच्या बाबतीत कोणताही थेट व्यापार नाही. मग इराणमधील शांततेमुळे भारतात सोने का स्वस्त झाले? तर हा संबंध तेल, डॉलर आणि भारतीय रुपयाच्या माध्यमातून जोडलेला आहे. इराण हा पश्चिम आशियातील (Middle East) एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा तेल उत्पादक देश आहे. तसेच जागतिक तेल व्यापाराचा मुख्य मार्ग असलेली ‘स्ट्रेथ ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) ही समुद्री सीमा इराणच्या नियंत्रणात येते. युद्धाच्या काळात इराणने हा मार्ग रोखल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती गगनाला भिडल्या होत्या.
भारत आपली तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी जवळपास ८० टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. जेव्हा तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा भारताला तेल खरेदी करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स मोजावे लागतात. डॉलरची मागणी वाढल्यामुळे भारतीय रुपया कमजोर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यवहार हा केवळ अमेरिकन डॉलरमध्ये होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा रुपया कमजोर होतो, तेव्हा भारताला परदेशातून सोने आयात करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात, परिणामी भारतातील स्थानिक बाजारात सोन्याचे दर प्रचंड वाढतात. आता इराण आणि अमेरिका यांच्यात करार झाल्यामुळे तेलाचा पुरवठा सुरळीत झाला असून तेलाचे भाव घसरले आहेत. यामुळे भारताचा डॉलरमधील आयात खर्च वाचला असून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाला आहे. रुपया मजबूत झाल्यामुळे भारतात आयात होणारे सोने थेट स्वस्त झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान
इराण-अमेरिका शांतता करार होताच जागतिक बाजारातील भीतीचे सावट पूर्णपणे दूर झाले आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, आता युद्ध होणार नाही याची खात्री पटल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये सुरक्षित ठेवलेला आपला पैसा वेगाने बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. हा पैसा आता पुन्हा एकदा जगातील मोठ्या शेअर बाजारांमध्ये आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये गुंतवला जात आहे. जेव्हा बाजारात स्थिरता येते, तेव्हा सोन्याची मागणी अचानक कमी होते आणि पुरवठा वाढल्यामुळे किमती झपाट्याने खाली येतात.
याशिवाय, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (Federal Reserve) महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात केलेल्या बदलांचाही सोन्यावर परिणाम झाला आहे. जेव्हा बँका व्याजदर जास्त ठेवतात, तेव्हा गुंतवणूकदारांना सोन्यापेक्षा रोख रक्कम किंवा सरकारी रोख्यांमध्ये अधिक परतावा मिळतो. यामुळेही सोन्याची चमक कमी झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर, जागतिक शांतता, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि मजबूत झालेला भारतीय रुपया या त्रिकुशामुळेच आज भारतात सोन्याचे भाव १५,००० रुपयांनी घसरले आहेत, जे बाजाराच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक मानले जात आहे.






