
digital raksha bandhan 2026
आज देशभरात साजरे होतेय रक्षाबंधन
सध्या रक्षाबंधन डिजिटल स्वरूपात
थेट UPIवर पैसे पाठवण्याचा पर्यायाचा वापर
पुणे/किरण ढोणे: दादा, राखी बांधली… आता फोनवर QR कोड पाठवतेय, गिफ्ट तुझ्या पसंतीचं तूच घे… पूर्वी बहिणीच्या हातातील राखी, भावाच्या कपाळावरील टिळा आणि मिठाईचा घास म्हणजे रक्षाबंधन. आता त्यात मोबाईलची स्क्रीन, व्हिडिओ कॉल, UPI आणि ऑनलाइन शॉपिंगची भर पडली आहे. पुण्यातील तरुण भावंडांसाठी रक्षाबंधनाचा धागा तसाच असला, तरी तो व्यक्त करण्याची पद्धत मात्र डिजिटल झाली आहे.
शहरातील शिक्षण, नोकरी आणि IT क्षेत्रामुळे अनेक भाऊ-बहीण वेगवेगळ्या शहरांत किंवा देशांत राहतात. प्रत्यक्ष भेट शक्य नसली, तरी व्हिडिओ कॉलवर राखी बांधण्याचा क्षण, ऑनलाइन पाठवलेली मिठाई आणि UPIवर केलेले ‘राखी गिफ्ट’ यामुळे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुण्यातील अनेक तरुण भावंडांमध्ये आता “तुला काय गिफ्ट हवं?” हा प्रश्न विचारण्याऐवजी थेट UPIवर पैसे पाठवण्याचा पर्याय वाढला आहे. बहिणीने भावाला ऑनलाइन गिफ्ट व्हाउचर पाठवणे, भावाने बहिणीच्या खात्यात पैसे जमा करणे किंवा दोघांनी मिळून ऑनलाइन शॉपिंग करणे—रक्षाबंधनाच्या भेटीची व्याख्याही बदलत आहे. विशेष म्हणजे, काही भावंडे गिफ्टपेक्षा ‘तुझ्यासाठी काहीतरी पाठवलंय, तू तुझ्या आवडीचं घे’ या एका मेसेजमध्ये आपुलकी शोधत आहेत.
भावाला राखी पाठवायची राहिली? आता देश-विदेशात अवघ्या १५ मिनिटांत पोहोचवता येईल राखी
IT, शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या तरुण-तरुणींच्या आयुष्यात हा बदल अधिक जाणवतो. बहिण पुण्यात आणि भाऊ बंगळुरू, मुंबई किंवा परदेशात; अशा परिस्थितीत राखी आधीच कुरिअरने पाठवली जाते. ठरलेल्या वेळी व्हिडिओ कॉल सुरू होतो. बहिण स्क्रीनसमोर राखी दाखवते, भाऊ हात पुढे करतो आणि दोघेही काही क्षणांसाठी प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात.
कधी कधी मात्र स्क्रीनच्या पलीकडेही छोटा सरप्राइज असतो—भावाने ऑनलाइन पाठवलेलं गिफ्ट घराच्या दारात पोहोचतं आणि बहिणीला राखी बांधल्यानंतर काही तासांनी त्याची डिलिव्हरी मिळते.
मोबाईल, UPI आणि ऑनलाइन गिफ्टमुळे रक्षाबंधनाची पद्धत बदलली असली, तरी भावंडांच्या नात्यातील भावना मात्र तशाच आहेत. उलट, दूर असलेल्या भावंडांसाठी तंत्रज्ञानाने सण साजरा करण्याचा नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. राखी हातावर बांधली जात असली, तरी आज तिचं गिफ्ट QR कोडमधून येतंय; भेटीऐवजी व्हिडिओ कॉल होतोय; आणि मिठाईच्या डब्याऐवजी ऑनलाइन ऑर्डर दारात पोहोचतेय. रक्षाबंधनाचा धागा मात्र अजूनही तितकाच घट्ट आहे. फक्त त्याची ‘डिलिव्हरी’ डिजिटल झाली आहे.
– २०१६-१७ : १.७८ कोटी UPI व्यवहार
– २०२५-२६ : २४,१६२ कोटींहून अधिक व्यवहार
– दशकभरातील वाढ : तब्बल १३ हजार पटींनी
– व्यवहारांचे मूल्य : ₹७,००० कोटींवरून ₹३१४ लाख कोटी
– मासिक व्यवहारांचा उच्चांक : जुलै २०२६ मध्ये २,३६६ कोटी
– दररोजचे व्यवहार : ६६ कोटींहून अधिक
– UPIशी जोडलेल्या बँका : २०१६ मधील ४४ वरून २०२५-२६ मध्ये ७०३
– आंतरराष्ट्रीय विस्तार : ११ देशांमध्ये UPI सेवा
– जागतिक डिजिटल व्यवहारांतील वाटा : २०२५ मध्ये जवळपास ४९ टक्के