हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६
विभाग ‘अ’मधील गट ‘अ’च्या सामन्यात हॉकी झारखंडने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत हॉकी चंदीगडचा ६-० असा पराभव केला. झारखंडकडून पुष्पा डांग हिने २०व्या आणि ४४व्या मिनिटाला दोन गोल करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय होरो एस्तेरने ३९व्या, मुंदरी सरोजने ४०व्या, जमुना कुमारीने ५१व्या आणि संगीता कुमारीने ५४व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला. चंदीगडच्या संघाला संपूर्ण सामन्यात गोल नोंदवता आला नाही. या विजयासह हॉकी झारखंडने गटात विजयी सुरुवात करत आपली आघाडी मजबूत केली.
Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात
हरियाणाचा बंगालवर १०-१ असा दणदणीत विजय
गट ‘ब’मधील सामन्यात हॉकी हरियाणाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत हॉकी बंगालवर १०-१ असा मोठा विजय मिळवला. हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक गोलफरकाचा विजय ठरला. हरियाणाकडून कौर सुखप्रीत हिने २ऱ्या आणि २१व्या मिनिटाला दोन गोल केले. अंजनी हिने ६व्या, ४९व्या आणि ५७व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली. खासा शशी हिने १४व्या आणि ४७व्या मिनिटाला दोन गोल केले. भाव्या आणि खुशी यांनी २९व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला, तर दीक्षाने ५२व्या मिनिटाला गोल करत हरियाणाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हॉकी बंगालकडून जाडिया साल्मी हिने १७व्या मिनिटाला संघाचा एकमेव गोल केला.
उत्तर प्रदेश-मणिपूर सामना बरोबरीत
गट ‘क’मध्ये उत्तर प्रदेश हॉकी आणि मणिपूर हॉकी यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची झाली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गोल करता आल्याने सामना १-१ असा बरोबरीत सुटला. उत्तर प्रदेश हॉकीकडून पटेल वंदना हिने २०व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, त्याच २०व्या मिनिटात मणिपूर हॉकीच्या हुड्रोम बिद्यालक्स्मी देवी हिने गोल करत सामना पुन्हा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघांना आणखी गोल करण्यात यश आले नाही. परिणामी, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
गुणतालिकेत कर्नाटक आघाडीवर
रविवारच्या सामन्यांनंतर विभाग ‘ब’च्या गट ‘ब’मध्ये हॉकी कर्नाटक ३ सामन्यांत ९ गुणांसह आघाडीवर आहे. हॉकी उत्तराखंड ४ सामन्यांत ७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून, हॉकी बिहार ३ सामन्यांत ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.हॉकी तामिळनाडू ३ सामन्यांत ३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. गोअन्स हॉकीला स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.