
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने केलेल्या दमदार कामगिरीनंतर आता भारताची १७ वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंघलने (Antim Panghal) इतिहास रचला आहे. बुल्गारियाच्या (Bulgari) सोफिया (Sofia) येथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील कुस्ती जागतिक स्पर्धेच्या ५३ किलो वजनी गटाचा अंतिम सामना जिंकत अंतिमने सुवर्ण पदक पटकावले आहे. २० वर्षांखालील कुस्ती जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी अंतिम पंघालन पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.
स्पर्धेत अंतिम पंघलनं सातत्यानं चांगली कामगिरी केली. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत अंतिमनं जर्मनीच्या अमोरी अँड्रिचचा क्निकल सुपीरियॉरिटीनं (११-०) पराभव केला. तसेच उपांत्यपूर्व फेरीत जपानची कुस्तीपटू अयाका किमुरा हिचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत युक्रेनच्या नतालिया क्लिव्हचुस्तकाचा ११-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात ही कझाकस्तानच्या अॅटलिन शागायेवाचा८-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे.
सुवर्णपदक सामना जिंकल्यानंतर अंतिम म्हणाली की, ‘मला रेकॉर्डबद्दल माहिती नव्हती. सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी मला सांगितले की, ही स्पर्धा जिंकणारी तू पहिली भारतीय मुलगी आहेस. मला कुस्तीमध्ये करिअर करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी माझ्या पालकांचं आभार मानते. विशेषत: दीदीने (कबड्डीपटू सरिता) मला खूप पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले. ऑलिम्पिकमध्येही भारतासाठी पदक जिंकण्याचं माझं ध्येय आहे. अंतिमने यापूर्वी कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०२१) मध्ये कांस्य आणि आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप (२०२२) मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. तिनं यावर्षी अंडर २३ आशियाई चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक जिंकले होते.