Asia Cup 2025: India will start their campaign against UAE, know the head to head record in T20 format
IND vs UAE : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यावेळी ही स्पर्धा टी२० स्वरूपात खेळवली जाणार आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याच वेळी, टीम इंडिया १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध आपला पहिला सामाना खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. अशा परिस्थितीत, सूर्यकूमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ युएईला हलके घेण्याची चूक करू शकणार नाही.
भारत आणि हाँगकाँग यांच्यात आतापर्यंत टी२० क्रिकेटचा फक्त एकच सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात टीम इंडियाने युएईला वाईटरित्या पराभूत केले होते. या दरम्यान, भारतीय संघातील खेळाडूंनी खेळाडूंनी आपले दमदार प्रदर्शन केले होते.
हेही वाचा : Asia cup 2025 : भारतीय संघाचा ‘काका’ कोण? आशिया कपमध्ये ‘या’ गोष्टीवर ज्याची असेल नजर, एकदा वाचाच..
भारत आणि यूएई यांच्यात ३ मार्च २०१६ रोजी मीरपूर येथे पहिला टी २० सामना खेळला गेला होता. टी-२० आशिया कपच्या या सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूएई संघाने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून फक्त ८१ धावा केल्या होत्या. यूएई संघाला खाते उघडताच सलामीवीर स्वप्नील पाटील (१) ची विकेट गमवावी लागली होती. तर दुसरी धाव घेताच संघाने मोहम्मद शहजादची शून्यावर विकेट देखील गमावली होती.
यूएईसाठी शैमान अन्वरने रोहन मुस्तफासह तिसऱ्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी केली होती. मुस्तफा २२ चेंडूत फक्त ११ धावा काढून माघारी परतला होता. शैमान अन्वर संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने ४८ चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांसह ४३ धावांची खेळी साकारली होती. या दोघांव्यतिरिक्त, यूएईचा कोणत्याच फलंदाजाला मैदानावर टिकाव धरता आला नव्हता. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन बळी घेतले होते. तर जसप्रीत बुमराह, हरभजन सिंग, हार्दिक पंड्या, पवन नेगी आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट चटकावली होती.
सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने फक्त १०.१ षटकामध्येच विजय मिळवला होता. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ५.५ षटकांत ४३ धावांची भागीदारी रचली होती. रोहित शर्मा २८ चेंडूंत ३९ धावा काढल्यानंतर बाद झाला होता.
यानंतर, धवन नाबाद १६ आणि युवराज सिंग नाबाद २५ धावा करून यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची अखंड भागीदारी रचून भारताचा विजय निश्चित केला होता. भारतीय संघाने ५९ चेंडू शिल्लक असताना नऊ विकेटने सामना आपल्या खिशात टाकला होता.