संदीप शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
DC vs RR : आयपीएल २०२५ चा १८ हंगामाला चांगलाच रंग चढला आहे. आतापर्यंत ३२ सामने खेळवून् झाले आहेत. काल ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला होता. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या पराभवासह, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने आपल्या नावावर एक नकोसा विक्रम स्थापित केला आहे. जो कुणालाही नकोसा वाटेल. आयपीएलच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वात लांब षटक टाकून संदीप शर्माने शार्दुल ठाकूरसह या लज्जास्पद यादीत स्वत:ला सामील करुन घेतले आहे.
हेही वाचा : MI vs SRH : मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज बुमराह कमाल करणार? सनरायझर्स हैदराबादविरुद्ध उतरणार मैदानात..
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. आयपीएल २०२५ च्या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये, दिल्लीच्या डावातील २० वे षटक टाकताना संदीपने एकूण ११ चेंडू टाकले आहेत. त्यात त्याने ४ वाईड आणि एक नो बॉल टाकला. यासह, तो सर्वात जास्त वेळ षटके टाकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला.
मंगळवारी (८ एप्रिल) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यात शार्दुलने एका षटकात ११ चेंडू टाकले होते. आयपीएलच्या इतिहासात ११ चेंडूंचा षटक टाकणारा मोहम्मद सिराज हा पहिला गोलंदाज ठरला होता. २ एप्रिल २०२३ रोजी बेंगळुरू येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने हा नकोसा विक्रम केला होता. ३ एप्रिल २०२३ रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात तुषार देशपांडे याने हा पराक्रम केला आहे.
हेही वाचा : PBKS vs KKR : ‘फक्त षटकार मारणं हेच सगळं..’: केकेआरच्या कामगिरीवर कर्णधार अजिंक्य रहाणेचा चढला पारा..
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये काल थरारक सामना पार पडला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ५ गडी गमावून १८८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये अभिषेक पोरेलने ४९, केएल राहुलने ३८, स्टब्सने ३४, अक्षर पटेलने ३४ आणि आशुतोष शर्माने १५ धावा केल्या. तसेच राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने २, हसरंगाने १ आणि तीक्षाने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सनेही ४ विकेट गमावत १८८ धावा केल्या आणि सामना बरोबरीत आणला. सामाना टाय झाला आणि सुपर ओव्हर पार पडली. त्यामध्ये दिल्लीने बाजी मारली. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दोन गडी गमावून पाच चेंडूत ११ धावा केल्या. दिल्लीने राजस्थानचे १२ धावांचे आव्हान चार चेंडूतच पूर्ण केले. ट्रिस्टन स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत दिल्लीचा विजय निश्चित केला.