
सावधान Team India! वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक नको (Photo Credit- X)
वेस्ट इंडिजने या विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमध्ये अजेय राहून सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, सुपर-८ फेरीत त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ गडी राखून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तत्पूर्वी, त्यांनी झिम्बाब्वेवर मात केली होती. दुसरीकडे, भारतीय संघालाही सुपर-८ च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नमवले होते, परंतु दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवून आपले आव्हान कायम राखले आहे.
भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असला, तरी वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे २०१६ च्या टी-२० विश्वचषकातील तो कधीही न विसरता येणारा उपांत्य फेरीचा सामना. ३१ मार्च २०१६ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले होते.
त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर १९२ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, लेंडल सिमन्सच्या नाबाद ८२ आणि आंद्रे रसेलच्या २० चेंडूंतील स्फोटक ४३ धावांच्या जोरावर विंडीजने १९.४ षटकांत लक्ष्य गाठून भारताला ७ गडी राखून पराभूत केले होते. योगायोग म्हणजे त्यावेळचा कर्णधार डॅरेन सॅमी आता वेस्ट इंडिज संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
१ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर जेव्हा सूर्या सेनेचा संघ मैदानात उतरेल, तेव्हा २०१६ मधील त्या पराभवाचा बदला घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे, २०१६ च्या त्या ऐतिहासिक सामन्यात खेळलेले हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे दोन खेळाडू आजही भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. वेस्ट इंडिजची विजयी घोडदौड रोखण्यासाठी आणि भारताला उपांत्य फेरीत नेण्यासाठी या अनुभवी जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे.