
Gautam gambhir Birthday
गौतम गंभीरने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांचे लहानपणापासूनच भारतीय सैन्यात सामील होण्याचे स्वप्न होते. त्यांना आपल्या देशाची सेवा करायची होती. सैन्याचा गणवेश परिधान करणे हे त्याचे अंतिम ध्येय होते. परंतु, नशिबाने वेगळाच डाव साधला. क्रिकेट हळूहळू त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आणि याच खेळाने त्याला यशाच्या नव्या उंचीवर पोहोचवले. गंभीरने असेही सांगितले की, सैन्यात सामील न झाल्याची खंत त्याला नेहमीच वाटेल. त्याच्यासाठी भारतीय सैन्य हा केवळ करिअरचा पर्याय नव्हता, तर त्याचे पहिले प्रेम होते. क्रिकेटमध्ये यश मिळवल्यानंतरही सैन्याबद्दलची त्याची आवड किंचिंतही कमी झाली नाही.
गौतम गंभीरच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा बारावीत असताना आला. याच काळात त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. गंभीरच्या मते, या संधीने त्याच्या कारकिर्दीची दिशाच बदलली. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, जर तो बारावीत रणजी ट्रॉफी खेळला नसता, तर त्याने नक्कीच राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये (NDA) प्रवेश घेतला असता. परंतु, क्रिकेट खेळण्याच्या संधीने त्यांना सैन्यात भरती होण्याच्या स्वप्नापासून दूर नेले.
भारतीय सैन्यात सामील होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले नसले तरी, गौतम गंभीरने क्रिकेटच्या मैदानावर देशाला गौरव मिळवून दिला. एक खेळाडू म्हणून त्याने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आणि भारताच्या मोठ्या विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २००७ च्या टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमधील त्याची कामगिरी क्रिकेट चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. दोन्ही विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये भारताच्या विजयात गंभीरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
खेळाडू म्हणून शानदार कारकिर्दीनंतर, गौतम गंभीरने मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून नवीन कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून देशाचे प्रतिनिधित्व करून स्वतःला वेगळे सिद्ध केले.