आशिया कपचा १७ वा सीझन सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू होत आहे आणि यावर्षी स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिराती (UAE) भूषवत आहे. मागील वर्षीची विजेती असलेली भारतीय टीम यावर्षी देखील विजेतेपद कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. २०२३ च्या वनडे फॉरमॅटमधील आशिया कपमध्ये भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. मात्र, यंदाचा आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे, ज्यामुळे लढती अधिक रोमांचक होणार आहेत. यावर्षी स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून, त्यांना प्रत्येकी चार संघांच्या दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. आशियातील उदयोन्मुख क्रिकेट संघांना यामुळे एक मोठी संधी मिळणार आहे.
दुबईच्या मैदानावरील टीम इंडियाचा रेकॉर्ड
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय संघाने आतापर्यंत एकूण १५ सामने (वनडे आणि टी-२०) खेळले आहेत. यापैकी भारताने १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर ४ सामन्यांत पराभव पत्करला आहे. एक सामना टाय झाला होता. विशेष म्हणजे, दुबईच्या याच मैदानावर भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलेले तिन्ही टी-२० सामने जिंकले आहेत.
आशिया कप वनडे फॉरमॅट: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १५ वनडे सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ८ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने ५ सामने जिंकले आहेत.
आशिया कप टी-२० फॉरमॅट: टी-२० फॉरमॅटमधील आशिया कपमध्ये दोन्ही संघांमध्ये ३ सामने झाले आहेत. यात भारताने २ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे.
एकूण टी-२० सामन्यांचा विचार करता, भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १३ सामने झाले आहेत. यात भारताने १०, तर पाकिस्तानने ३ सामने जिंकले आहेत.
आशिया कपमध्ये भारतीय संघाचा दबदबा नेहमीच राहिला आहे. भारताने आतापर्यंत सर्वाधिक ८ वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ यावर्षी विजेतेपदाची हॅटट्रिक करू शकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.