फायनलआधी ICC ची सूर्यकुमार यादववर मोठी कारवाई (Photo Credit- X)
Suryakumar Yadav Fine: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला मोठा धक्का बसला आहे. आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतरच्या एका घटनेमुळे आयसीसीने त्याच्यावर कडक कारवाई केली असून, त्याला ३० टक्के सामान्याच्या मानधनाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या वर्षीच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला एकतर्फी पराभूत केले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला सात विकेट्सने हरवले होते.
Suryakumar Yadav has been fined 30% of his match fees as he was found guilty of breaching the code of conduct for his comments that alluded to the military skirmish between India and Pakistan, after their group match in the Asia Cup on September 14 👉https://t.co/v1Qa7243LB pic.twitter.com/CDMS3XSQpd — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 26, 2025
सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना, सूर्यकुमार यादवने भारतीय सैन्याला पाठिंबा देणारे एक विधान केले, ज्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. आयसीसीने या प्रकरणाची सुनावणी घेतली आणि यादवला दोषी ठरवले, त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, अशीही बातमी आहे की सूर्यकुमार यादवने या शिक्षेविरोधात अपील दाखल केले आहे. याचा अर्थ, आता या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर जो निर्णय येईल तो अंतिम मानला जाईल. आशिया कप फायनलपूर्वी, भारत आणि श्रीलंकेचा संघ दुबईमध्ये एकमेकांशी भिडत आहे. त्यानंतर, २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा अंतिम सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. त्या रात्रीपर्यंत, आशिया कपच्या चॅम्पियनचा निर्णय होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध असे आहेत की, दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानात जेव्हा-जेव्हा एकमेकांसमोर येतात, तेव्हा कोणती ना कोणती घटना घडतेच.
भारत आणि पाकिस्तानने सध्याच्या आशिया कप स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. गट टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले होते. त्यानंतर, सुपर फोरमधील सामन्यातही शेजारील पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेत जोरदार कामगिरी करत सलग पाच सामने जिंकले आहेत आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने दोन सामने गमावले असले तरी, अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.