IND Vs ENG: Gautam Gambhir gives new energy to the Indian team before the series against England! He also commented on the comeback of 'this' player..
IND Vs ENG : २० जूनपासून भारत आणि इंग्लंड या दोन संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे सर्व खेळाडू संघात सामील झाले आहेत. भारतीय संघ बेकेनहॅममध्ये भारत अ संघासोबत एक आंतर-संघ सामना खेळणार आहे. यासाठी सर्व खेळाडू आपापसात सराव करताना दिसून येत आहेत. हा सामना १३ जूनपासून खेळला जाणार आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात सामील झालेल्या साई सुदर्शन आणि अर्शदीप सिंगचे स्वागत केले आहे. गंभीर म्हणाला की, मित्रांनो, आता आपल्याकडे एक संपूर्ण संघ असून मी सर्वांचे स्वागत करू इच्छितो. पहिल्या कसोटीसाठी संघात समावेश होणे नेहमीच विशेष असते. म्हणूनच मी साईचे स्वागत करू इच्छितो. ज्याने तीन महिन्यांत फलंदाजीने प्रभावित केले आहे. मला खात्री आहे की कसोटी कारकीर्दही चांगली राहणार आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे देखील गौतम गंभीरने स्वागत केले. तेव्हा तो म्हणाला की, की अर्शने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मला विश्वास आहे, की तू याचा फायदा कसोटी क्रिकेटमध्ये देखील घेशील. तसेच गंभीरने करुण नायरच्या पुनरागमनाचे देखील मनापासून स्वागत केले आहे. गंभीरने करुण नायरच्या कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचे कौतुक केले आहे.
गंभीरने सांगितले की, ‘पुनरागमन कधीच सोपे नसते आणि त्यातही तब्बल ७ वर्षांनी पुनरागमन करणे ही एक मोठी गोष्ट आहे. गेल्या वर्षी करुणने चांगल्या धावा केल्या आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझी कधीही हार न मानण्याची वृत्ती. याच वृत्तीने तुला पुन्हा संघात स्थान मिळवून दिले आहे, ही संपूर्ण संघासाठी एक मोठी प्रेरणा असणार आहे. स्वागत आहे, करुण.’ असे गौतम गंभीरने म्हटले आहे.
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या शुभमन गिलचे देखील अभिनंदन केले आहे. तेव्हा गंभीरने म्हटले की, ‘तुमच्या देशाच्या संघाचे नेतृत्व करणे ही खूप सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. शुभमनचेही मी अभिनंदन करू इच्छितो, तो पहिल्यांदाच कर्णधार झाला असून देशात तुमच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्यापेक्षा दूसरा मोठा सन्मान नाही.’ त्यानंतर गंभीरने ऋषभ पंतचे नेतृत्व गटात भाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
हेही वाचा : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलची ICC ने केली घोषणा, वाचा 9 संघाचे संपूर्ण वेळापत्रक
गौतम गंभीरने स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून संघात निवड झालेल्या एड्रियन ले रॉक्स यांचे देखील स्वागत केले आहे. गौतम गंभीर म्हणाला की, ‘मी अशा व्यक्तीचे स्वागत करू इच्छितो ज्याच्यासोबत मला केकेआरमध्ये सात वर्षे काम करता आले, ज्या व्यक्तीची मी खात्री देऊ शकतो. तो एक अविश्वसनीय व्यावसायिक आणि एक उत्तम माणूस आहे.’ असे गंभीर म्हणाला.