IND vs ENG: Good news for England team! 'This' fast bowler who made batsmen cry will return to the team
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड त्यांच्या मुख्य वेगवान गोलंदाजाशिवाय मैदानात उतरले आहेत. इंग्लंडचे अनेक प्रमुख वेगवान गोलंदाज, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, मार्क वूड दुखापतग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत, संघ नवीन वेगवान गोलंदाजांसह खेळत आहे. ज्याचा भारतीय संघाकडून चांगलाच फायदा घेण्यात आला. भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा उभ्या केल्या, या दरम्यान भारताकडून शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जैसवाल या तिघांनी शतक झळकावले आहेत.
पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांची वाईट स्थिती बघून, जोफ्रा आर्चर दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. तो आता दुखापतीतून सावरला आहे. आर्चर दुसऱ्या कसोटीपूर्वी डरहममध्ये ससेक्ससाठी काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत, त्याचे पुनरागमन निश्चित होणार आहे. हा वेगवान गोलंदाज दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे संघाची गोलंदाजी अधिक बळकट होईल.
स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, जोफ्रा आर्चर ससेक्ससाठी रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळणार आहे. जरी त्याचे नाव काउंटी चॅम्पियनशिपच्या या सामन्यासाठी संघात समाविष्ट नव्हते. जर तो या सामन्यात खेळू शकला तर तो एजबॅस्टन येथे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या काउंटी सामन्यासाठी तो ससेक्स संघात असण्याला दुजोरा दिला आहे. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आर्चर दुखापतींमुळे चार वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला नाही.
आर्चरने २०२१ पासून इंग्लंडसाठी केवळ मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या महिन्याच्या सुरुवातीला म्हणाला होता की “आर्चरला कसोटी क्रिकेटमध्ये परतायचे आहे, तो अनेक वेळा मला संदेश देखील पाठवतो. मी त्याला घाई करू नका असा सल्ला दिला. तो दुखापतींमुळे खूप त्रस्त आहे. त्याचे पुनरागमन इंग्लंडसाठी रोमांचक असेल. आशा आहे की तो कसोटी क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल.”
हेही वाचा : IND Vs ENG : क्रिकेट विश्वावर शोककळा! लीड्स कसोटीदरम्यान इंग्लंडच्या दिग्गजाने घेतला अखेरचा श्वास..
भारताविरुद्ध अँडरसन तेंडुलकर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आर्चर आणि मार्क वूडशिवाय इंग्लंडचा गोलंदाजीचा हल्ला कमजोर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, आर्चरचे पुनरागमन इंग्लंडसाठी मोठा दिलासादायक असणार आहे.