
Saransh Jain makes Test debut in Colombo
सारांश जैनने वयाच्या ३३ वर्षे आणि १४५ दिवसांनी भारतासाठी कसोटी पदार्पण केले. यासह, तो १९९९ नंतर भारताचा सर्वात वयस्कर कसोटी पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वयाच्या ३३ वर्षांनंतर भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा खेळाडू रॉबिन सिंग होता. त्याने १९९८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे कसोटीत वयाच्या ३५ वर्षे आणि २३ दिवसांनी पदार्पण केले होते.
सारांश जैन हा एक फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, जो मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याचा जन्म ३१ मार्च १९९३ रोजी इंदौर येथे झाला. त्याचे वडील, सुबोध जैन, हे मध्य प्रदेशचे माजी प्रथम-श्रेणी क्रिकेटपटू असून त्यांनी संघासाठी नऊ सामने खेळले आहेत. त्यांनी आपला मुलगा सारांश जैनला क्रिकेटपटू बनण्याच्या त्याच्या ध्येयात पूर्ण पाठिंबा दिला. सारांश २०१४ पासून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे आणि आता १२ वर्षांनंतर त्याला ही संधी मिळाली आहे. २०२२ मध्ये मध्य प्रदेशच्या रणजी ट्रॉफी विजयात सारांशने महत्त्वाची भूमिका बजावली. २०२५-२६ च्या हंगामात त्याने ५७.५५ च्या सरासरीने फलंदाजी करत ५१८ धावा केल्या आणि ३० विकेट्स घेतले.
सारांश जैनने डिसेंबर २०१४ मध्ये तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने ५४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १८८ विकेट्स घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ३.०१ असून त्याने १० वेळा पाच विकेट्स घेतले आहेत. सारांश जैनने फलंदाजीमध्येही आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्याने दोन शतके आणि १४ अर्धशतकांसह ३१.७५ च्या सरासरीने २२२३ धावा केल्या आहेत.
२०२५ च्या दुलीप ट्रॉफीमध्ये, सारांशने सेंट्रल झोनच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने स्पर्धेत १६ विकेट्स घेतले. यासाठी त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर त्याने इंडिया ‘अ’ संघाच्या श्रीलंका दौऱ्यावर प्रभावी कामगिरी केली. ृगॉल येथे श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात, सारांशने सहा विकेट्स घेतले आणि नाबाद ७० धावांची खेळी केली.
वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नव्हता होता. त्यामुळे, निवड समितीने ३३ वर्षीय ऑफ-स्पिनर सारांश जैनचा संघात समावेश केला. सारांश पहिल्या कसोटीत सहभागी होऊ शकला नाही. बीसीसीआयने माहिती दिली की, स्टार फिरकीपटू कुलदीप यादव तापामुळे दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नाही. यामुळे सारांश जैनला पदार्पण करण्याची संधी मिळाली.