
IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी
इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये पार पडलेल्या मालिकेतील (IND vs WI) तिसऱ्या सामन्यात भारताने मागील पराभवाचा वचपा काढत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना 209 धावांवर रोखले. अशाप्रकारे या विजयासह भारताने पाच टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने वेस्ट इंडिजसमोर सर्वबाद 224 धावांचे आव्हान दिले होते. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने ज्याप्रकारे आक्रमक फलंदाजी करत 250 धावांचा आकडा पार केला होता, त्याकडे पाहता, या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कस लागणार हे मात्र निश्चित झाले होते.
सुरुवातीला मागच्याच सामन्याची हाइलाइट्स बघतोय की काय? असं वातावरण निर्माण झालं होते. पण लवकरच ग्रीप पकडत भारतीय बॉलर्सने कम बॅक केले. विंडीजने याही सामन्यात चांगला लढा देत, 7 बाद 209 धावांचा पल्ला गाठला.
सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने संजू सॅमसन (3)चा विकेट झटपट पडल्यानंतरही त्याचं ओझं आपल्या कामगिरीवर पडू दिलं नाही. त्यानं इशान किशनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. यातील 63 धावा या अभिषेकच्या होत्या. अभिषेकने 30 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. तो शतक पूर्ण करेल असे वाटत असताना, शेमर स्प्रिंगरने आपल्याच गोलंदाजीवर त्याला झेलबाद केले.
दरम्यान, या खेळीदरम्यान, अभिषेकने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 2,000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने आपली 33 वी धाव पूर्ण करताच हा विश्वविक्रम साधला.
भारताच्या मधल्या फळीतील इशान किशन (37) वगळता, कोणत्याच फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. तिलक वर्माने 28 धावा केल्या, पण तोही विचित्ररित्या धावचीत झाला. कर्णधार श्रेयस अय्यर (1) असो, नमन धीर (10) असो वा नितीशकुमार रेड्डी (21) स्वस्तात बाद झाले.
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय फलंदाजांवर दबावतंत्र निर्माण केले होते. रोस्टन चेजने तर अय्यर व लयात आलेल्या इशान किशनचा विकेट मिळवली. रोस्टन, शेमर जोसेफ आणि शेमर स्प्रिंगरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर किमो पाउल आणि गुडकेश मोती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
मागच्या सामन्यात टिकून खेळलेला कर्णधार शाई होप (5)ला यंदा मात्र दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने माघारी धाडले. पण शांत राहिल ती वेस्ट इंडिज टिम कुठली? मागच्या सामन्यात भोपळ्यावर बाद झालेल्या शिमरोन हेटमायर(43) ने आपली कला दाखवण्यास सुरुवात केली. त्याचं वादळ घोंघावत असताना नमन धीरने त्याला क्लिन बोल्ड केले. असंच काही कॅमेल पूरन (42) बाबतही घडले. नमनच्या एकाच षटकात 3 गगनचुंबी षटकार ठोकल्यानंतर, याच षटकात नमने त्याचा गेम केला व इशानकरवी सिमारेषेजवळ झेलबाद केले.
इतर गोलंदाज विकेट घेण्यास कमी पडले असले तरी त्यांनी धावगतीवर मात्र अंकुश लावला होता. अशाप्रकारे विंडीज या धक्क्यातून सावरू शकला नाही व भारतीय गोलंदाजांनीही त्यांना सावरू दिले नाही. भारताकडून अर्शदीपने 3, तर नमनने 2 विकेट घेतल्या.