
भारत की न्यूझीलंड? कोण मारणार बाजी? खिताबी लढतीपूर्वी काय सांगतो WIN Probabilty Result? (Photo Credit- X)
आजचा सामना केवळ क्रिकेटची लढत नसून भारतीय चाहत्यांसाठी भावनांचा खेळ आहे. याच मैदानावर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता, जिथे ऑस्ट्रेलियाने भारताचे स्वप्न भंग केले होते. त्या पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या असल्या तरी, आज त्याच मैदानावर न्यूझीलंडचा पराभव करून पुन्हा एकदा जगज्जेता बनण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे आहे. एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळला जाणारा हा सामना ऐतिहासिक ठरेल, यात शंका नाही.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने येत आहेत. एक रंजक आणि भारतासाठी काहीशी चिंतेची बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या तिन्ही विश्वचषक लढतींमध्ये न्यूझीलंडनेच बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केवळ विजेतेपदच नव्हे, तर ‘किवी’ संघाविरुद्धचा हा खराब रेकॉर्ड पुसून काढण्याचे मोठे आव्हान सूर्या सेनेसमोर असेल. तसेच दोन्ही संघामध्ये एकूण ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.
अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. बाउंड्री मोठी असली तरी खेळपट्टीचा संथपणा आणि फिरकीला मिळणारी मदत यामुळे सँटनर आणि अक्षर पटेल यांची भूमिका निर्णायक ठरेल. भारतासाठी सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांचा फॉर्म महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडकडे फिन ॲलन, डेवोन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांसारखे आक्रमक फलंदाज आहेत, जे एकहाती सामना फिरवू शकतात. गोलंदाजीमध्ये लॉकी फर्ग्युसनचा वेग आणि मॅट हेन्रीचा स्विंग भारताची परीक्षा घेऊ शकतो.
सध्याचा फॉर्म, संघाचे संतुलन आणि घरच्या मैदानावर मिळणारा प्रेक्षकांचा पाठिंबा पाहता, तज्ज्ञांच्या मते भारताचे पारडे जड आहे.
भारतीय संघाने आपली लय कायम राखल्यास आज अहमदाबादच्या आकाशात टीम इंडियाच्या विजयाची आतषबाजी निश्चित मानली जात आहे.
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोन्ची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन