भारतीय युवा संघाचा जलवा कायम (Photo Credit- X)
IND U19 Beat AUSU19: दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात भारतीय अंडर-१९ संघाने ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाला ५१ धावांनी हरवून शानदार विजय मिळवला. या विजयामुळे युवा भारतीय संघाचा दबदबा कायम राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३०० धावांचा डोंगर उभा केला, तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २४९ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून जेडन ड्रेपरने एकट्याने शतक झळकावले, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.
या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार आयुष महात्रे शून्यावर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा यांनी दमदार फलंदाजी करत प्रत्येकी ७० धावा केल्या. त्यानंतर अभिज्ञान कुंडूने ६४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. वेदांत त्रिवेदीच्या २६ धावांच्या योगदानाने भारतीय अंडर-१९ संघाने ३०० धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियासाठी विल बायरोमने सर्वाधिक तीन बळी घेतले.
India U19 complete a comprehensive 51-run over Australia U19 to take an unassailable 2-0 lead in the Youth ODI series.#AUSU19vINDU19 pic.twitter.com/vWISdoKQba — Circle of Cricket (@circleofcricket) September 24, 2025
३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी भागीदारी करता आली नाही. सलामीवीर अॅलेक्स टर्नरने २४ धावा केल्या. मात्र, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेडन ड्रेपरने ७२ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०७ धावा करून एकहाती झुंज दिली. शेवटी आर्यन शर्माने ४४ चेंडूत ३८ धावा केल्या, पण हे प्रयत्न विजयासाठी पुरेसे ठरले नाहीत. त्यामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ ५० षटकेही खेळू शकला नाही आणि ४७.२ षटकांत २४९ धावांवर बाद झाला.
भारतीय अंडर-१९ संघासाठी कर्णधार आयुष महात्रे आणि कनिष्क चौहान यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. आयुषने त्याच्या ४ षटकांच्या गोलंदाजीत २७ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याच्याशिवाय, कनिष्क चौहानला २ गडी बाद करण्यात यश आले. त्यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाला ३०० धावांचा टप्पा गाठता आला नाही.