सनिका माने (फोटो- सोशल मिडिया)
सानिकाच्या रक्तातच खेळाचा वारसा आहे. तिची आई ज्योती या माजी राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू असून मोठी बहीण कृष्णानेही राष्ट्रीय पातळीवर हॉकीचे प्रतिनिधित्व केले आहे, तर तिचे वडील चंद्रकांत हे शेतकरी आहेत. सुरुवातीला ॲथलेटिक्सकडे कल असलेल्या सानिकाने पुढे हॉकीची कास धरली. तिची गुणवत्ता सर्वप्रथम प्रशिक्षक अनिकेत मोरे यांनी हेरली. त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) दर्जेदार प्रशिक्षणामुळे तिच्या खेळाला तांत्रिक परिपक्वता व नवा आत्मविश्वास मिळाला. प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित सुविधांवर मात करत सानिकाने गावच्या मैदानावरून थेट भारतीय ज्युनियर संघात स्थान पटकावले.
चीनमधील २०२६ ज्युनियर आशिया कप स्पर्धेत सानिका भारताच्या आक्रमक फळीतील हुकमी एक्का ठरली
· द. कोरियाविरुद्ध: भारताच्या ४-१ विजयात १ गोल नोंदवला.
· मलेशियाविरुद्ध: ११-१ अशा एकतर्फी विजयात २ गोल डागले.
· जपानविरुद्ध: १ गोल करत भारताला मजबूत आघाडी दिली.
· पाकिस्तानविरुद्ध: २ सुरेख गोल झळकावत वर्चस्व राखले.
यजमान चीनविरुद्धचा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा ठरला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी कडवी टक्कर दिली तरी गोलशून्य बरोबरी राहिली. अखेर दुसऱ्या क्वार्टरमध्ये १७व्या मिनिटाला सर्कलमध्ये आलेला एक लांब पास हेरून सानिकाने क्षणाचाही विलंब न करता अचूक फटक्याने चेंडू गोलजाळ्यात धाडला आणि स्कोअरबोर्ड १-० असा झाला. यानंतर चीनने बरोबरी साधण्यासाठी आक्रमणांची मालिका रचली; मात्र भारतीय बचावफळीने प्रत्येक हल्ला परतावून लावत अंतिम शिट्टी वाजेपर्यंत १-० अशी विजयी आघाडी कायम राखली.
या विजयामुळे भारताने FIH ज्युनियर महिला विश्वचषकासाठीची आपली पात्रता निश्चित केली आहे. तिकडे चीनमध्ये सानिकाने गोल केला आणि इकडे कोल्हापूरच्या नूल गावात एकच जल्लोष सुरू झाला. शेतकरी कुटुंबातील लेकीने जगाच्या मंचावर भारताचा तिरंगा फडकवल्याने गावकऱ्यांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी केली. सानिकाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करताना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहयोगी उपाध्यक्ष, हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष आणि हॉकी महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे म्हणाले, “सानिका मानेने मिळवलेले हे यश अत्यंत मोठे आहे. आशिया कपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक गोल करून भारताला विजेतेपद मिळवून देणे ही महाराष्ट्राच्या हॉकीसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.






