IPL 2025 :अंबाती रायुडूकडून CSK साठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा; 'या' बड्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या 18 व्या हंगामात मैदानात उतरणार आहे. तो सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचा इराद्याने प्रत्येक सामना खेळताना दिसून येणार आहे. आगामी मोसमासाठी चेन्नई सुपर किंग संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून फ्रँचायझीने अनेक खेळाडूंचा समावेश केला आहे. यातील खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमद याचा समावेश आहे. फ्रँचायझीने 20 वर्षीय क्रिकेटपटूला 10 कोटी रूपये खर्च करून विकत घेतले आहे.
अशातच आता सीएसकेसाठी तीन विजेतेपद पटकावणाऱ्या अंबाती रायडूने नूर अहमदला आपल्या संघात स्थान दिलेले नाही. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी अंबाती रायुडूने चेन्नई सुपर किंगसाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हन संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये त्याने नूर अहमदला त्याच्या प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले आहे.
हेही वाचा : IPL 2025 : ‘…म्हणूनच माझी बदनामी’; आयपीएलपूर्वीच श्रेयस अय्यरची खदखद बाहेर..
रायुडूने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना त्याची सलामीची जोडी म्हणून रुतुराज गायकवाडसह डेव्हन कॉनवेची निवड केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अतिशय चांगल्या अवस्थेत दिसलेल्या रचिन रवींद्रला त्याने तिसऱ्या क्रमांकावर पाठवणार असल्याचे सांगितले. चौथ्या स्थानासाठी त्याने तीन खेळाडूंची नावे सुचवली आहेत. राहुल त्रिपाठी, दीपक हुडा आणि विजय शंकर यांच्या नावांचा त्यात समावेश आहे.
रायुडूने तिसरा परदेशी खेळाडू म्हणून इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनची निवड केली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत मात्र त्याला आठव्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. रायुडूला शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी या मोठ्या खेळाडूंना पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना बघायचे आहे.
रायुडूने गोलंदाजीसाठी जडेजाचा फिरकी जोडीदार म्हणून रविचंद्रन अश्विनची संघात निवड केली आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये फिरकीसाठी अनुकूल ट्रॅकची अपेक्षा असून देखील त्याने केवळ दोन फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे.
तसेच मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून रायुडूने आपल्या संघात दोन गोलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये मथिशा पाथिराना व्यतिरिक्त 24 वर्षांचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आहे. CSK संघात खलील अहमदचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत खलीलऐवजी अंशुलची निवड करणे अत्यंत धक्कादायक आहे.
रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी/दीपक हुडा/विजय शंकर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, सॅम कुरान, रविचंद्रन अश्विन, अंशुल कंबोज आणि मथिशा पाथिराना.