
माही पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 साठी धोनीच्या पुनरागमनाची चाहत्यांना आशा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनी याच्या आयपीएलमधील भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. धोनीमध्ये अजूनही क्रिकेट बाकी असून, तो IPL 2027 मध्ये खेळणार की नाही, याचा निर्णय त्याचाच असेल, असे चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे. दुखापतीमुळे धोनीला आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामाला मुकावे लागले होते.
चेन्नईमध्ये माध्यमांशी बोलताना विश्वनाथन यांनी धोनीच्या पुढील हंगामातील सहभागाबाबत भाष्य केले. धोनी खेळणार की नाही, याचा निर्णय फ्रँचायझीने पूर्णपणे त्याच्यावर सोडला असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वनाथन म्हणाले, हा प्रश्न तुम्ही धोनीलाच विचारायला हवा. मलाही त्याला विचारावे लागेल. तो चेन्नईला येतो, तेव्हा स्वतःच्या निर्णयाबाबत आम्हाला सांगतो. मला वाटते की त्याच्याकडे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत राहण्याची शक्यता आहे. तो अजूनही खेळाडू आहे.
धोनीचे वय 45 वर्षे झाले असून, दुखापतीमुळे तो आयपीएल 2026 मध्ये एकही सामना खेळू शकला नव्हता. त्यामुळे आगामी हंगामात तो मैदानात परतणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू आणि भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनालाही धोनीने आणखी एक आयपीएल हंगाम खेळावा, असे वाटते. चेपॉक मैदानावर सीएसकेच्या पारंपरिक ‘लॅप ऑफ ऑनर’मध्ये सहभागी झाल्यानंतर रैनाने धोनीशी याबाबत चर्चा केली होती.
रैना म्हणाला, मी धोनीला सांगितले की, तू आयपीएल 2026 मध्ये खेळला नाहीस. त्यामुळे तो हंगाम मोजला जाणार नाही. तुला पुढील वर्षी पुन्हा मैदानात उतरावे लागेल.
धोनीने पुनरागमनाचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत, असेही रैनाने सूचित केले. धोनीचा निर्णय वैयक्तिक असेल. तो सकारात्मक असल्याचे मला वाटते. संघातही पुन्हा चांगले वातावरण निर्माण होत आहे. चाहत्यांनाही तो मैदानात परतावा असे वाटते. धोनीने ‘बघूया’ असे सांगितल्याने तो पुनरागमनासाठी मेहनत घेऊ शकतो, अशी आशा रैनाने व्यक्त केली.
ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या यष्टिरक्षकाची जबाबदारी कोण सांभाळणार, याचीही चर्चा सुरू आहे. मागील हंगामात संजू सॅमसनला संघात समाविष्ट करून सीएसकेने या प्रश्नाचे संभाव्य उत्तर दिले होते.
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. संघाने 14 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले, तर 8 सामन्यांत पराभव स्वीकारला. त्यामुळे गुणतालिकेत संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आता धोनी IPL 2027 मध्ये पुनरागमन करणार का?, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय धोनीच घेणार असल्याचे सीएसके व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.