
Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महापौर चषक 14 वर्षांखालील शालेय मुला-मुलींची बुद्धिबळ स्पर्धा (Chess Tournament) 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या (आरएमएमएस) वातानुकूलित सभागृहात ही स्पर्धा रंगणार असून, नऊ वयोगटांमध्ये एकूण 135 आकर्षक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, मुंबई महापौर, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. सहा ते 14 वर्षांखालील अशा नऊ वयोगटांमध्ये स्पर्धकांना सहभागी होता येईल. प्रत्येक वयोगटात 15 पुरस्कार दिले जाणार आहेत.
स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळवली जाणार असून, किमान चार फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीसाठी 15 मिनिटे आणि प्रत्येक चालीसाठी तीन सेकंदांची अतिरिक्त वेळ (इन्क्रिमेंट) दिली जाईल. तीन गटांमध्ये प्रथम पुरस्काराची हॅट्ट्रिक साधणाऱ्या विजेत्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिली. स्पर्धकांना संयोजकांतर्फे बुद्धिबळ पट आणि घड्याळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कांदिवली पश्चिमेतील साईनगर येथील बीएमसी शाळेत विनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धा पूर्वतयारी उपक्रम राबविण्यात आला. बुद्धिबळ प्रशिक्षक डॉ. सिद्धेश नर, मुख्याध्यापक संदीपन घुले, क्रीडा शिक्षक सुनील खोपकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय खेळाडूंनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्ज आणि अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजाबाबू गजेंगी किंवा प्रमोद पार्टे यांच्याशी 22 ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बुद्धिबळाच्या पटावर महाराष्ट्राची चमक; सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद