Surykumar Yadav : सूर्यकुमार यादवने घेतली कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट; चिमुरडीनं गायलेल्या भजनानं पंतप्रधानांचे मंत्रमुग्ध, सौजन्य : आयएएनएस
भारतीय टी-20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपली पत्नी देविशा शेट्टी व मुलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची खास भेट घेतली. दरम्यान, या भेटीचा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमारसोबत आलेल्या मुलीनं गायलेल्या भजनानं पंतप्रधान मोदी मंत्रमुग्ध झाल्याचे पाहण्यास मिळाले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते सूर्यकुमार यादव, त्याची पत्नी देविशा शेट्टी आणि त्यांच्या सोबत आलेल्या मुलांशी संवाद साधताना दिसत आहेत. या वेळी सूर्यकुमारसोबत आलेल्या एका चिमुकलीने भजन सादर केले. तिचे भजन ऐकून मोदी भारावून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. तसेच मे महिन्यात जन्मलेल्या सूर्यकुमारची मुलगी रिधीमाचा या व्हिडिओमध्ये झलक पाहायला मिळते. पंतप्रधान मोदी यांनी रिधीमाला प्रेमाने जवळ घेत तिची विचारपूस केली.
या भेटीचा उल्लेख करताना मोदी यांनी एक्सवर लिहिले की, दिवाळीच्या वातावरणात राम आणि सरयूचे आगमन झाले आहे. त्यामुळे दिवाळीचे वातावरण अधिक पवित्र आणि दिव्य झाले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झालेली सूर्यकुमार यादव आणि त्याच्या कुटुंबीयांची पंतप्रधानांसोबतची ही भेट विशेष ठरली.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. मायदेशात टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला होता. मात्र, कर्णधार म्हणून विश्वविजेतेपद मिळवूनही वैयक्तिक खराब फॉर्ममुळे सूर्यकुमारला पुढील मालिकेतून वगळण्यात आले. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.
आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी त्याच्याकडे मुंबई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. एकेकाळी टी-20 क्रमवारीत जगातील अव्वल फलंदाज राहिलेल्या सूर्यकुमारने भारताकडून 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत चार शतके आणि 25 अर्धशतकांसह 3 हजार 272 धावा केल्या आहेत.






